Tesla India Entry : एलॉन मस्कची टेस्ला लवकरच भारतात येण्याची शक्यता; कारची वैशिष्ट्य काय असतील?
Tesla India Entry : इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला Tesla लवकरच भारतीय बाजारात एन्ट्री करण्याची शक्यता आहे.
Tesla India Entry : एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला Tesla लवकरच भारतीय बाजारात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. नवीन रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, असे सांगण्यात आलं आहे की, भारत सरकार 30 लाखांहून जास्त किंमतीच्या कारसाठी टेस्लासारख्या जागतिक इलेक्ट्रिक कार निर्मात्यांसाठी नवे आयात शुल्क अंतिम करण्याच्या जवळ आहे. इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी केल्यास टेस्लासारख्या वाहन उत्पादकांसाठी भारतात प्रवेशाचा मार्ग सोपा होईल.
याआधी एलॉन मस्क देखील भारतात ईव्हीवरील आयात शुल्क कमी करण्याबाबब बोलत होते. एका वृ्त्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार, आयात शुल्कात कपात करण्याची ऑफर तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. तसेच, सूत्रांच्या माहितीनुसार, अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार टेस्लाला 2-3 वर्षांच्या कालावधीसाठी कमी आयात कर देण्याच्या दोरणावर काम करतायत.
भारतातील सध्याच्या आयात शुल्कावर आधारित परदेशातून कार आयात करणे हा महागडा व्यवहार आहे. त्यानुसार,अंदाजे 33 लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर 100 टक्के आयात शुल्क आणि त्यापेक्षा कमी किंमतीच्या कारवर 60 टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे.या सवलतीचा उद्देश टेस्लाच्या भारतातील प्रवेशाचा मार्ग सुलभ करणे आणि कंपनीच्या उत्पादन प्रकल्पासह भविष्यातील इतर योजनांना प्रोत्साहन देणे हा आहे.
टेस्लाचा प्लांट कुठे असेल?
टेस्लाच्या भारत प्रवेशाची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती आणि अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि मोदी यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर एलॉन मस्क यांनी भारतात टेस्ला कार लॉन्च करण्याबाबत आणि प्लांट उभारण्याबाबत चर्चा केली. टेस्लाचा प्लांट भारतात कुठे असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विचार करून प्लांट उभारण्याचा विचार केला जातोय.
काही दिवसांपूर्वी सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्गच्या एका अहवालात असं सांगण्यात आलं की, टेस्ला भारतात एका नवीन प्लांटमध्ये सुरुवातीला सुमारे 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखणार आहे. एवढेच नाही तर कंपनी भारतातून सुमारे 15 अब्ज डॉलर्सचे ऑटो पार्ट्स खरेदी करण्याचा विचार करतायत. याशिवाय, कारच्या किंमती कमीत कमी ठेवण्यासाठी टेस्ला भारतात बॅटरी तयार करू शकते. अशी देखील चर्चा आहे.