एक्स्प्लोर
Advertisement
अमरावतीत धुमाकूळ घालणाऱ्या 'बंटी-बबली'ला बेड्या, चक्रावून टाकणारी चोरीची पद्धत
केवळ चोऱ्या करण्यासाठी जाताना पत्नीला ती सांगेल त्या गावात किंवा शहरात कारने सोडून द्यायचे आणि तिची चोरी करून झाली की परत अमरावतीला घेवून यायचे, अशी पत्नीसेवा करणाऱ्या पतीला चोर पत्नीसह अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
अमरावती : उच्चपदस्थ किंवा चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या महिलेला तिचा पती दररोज नोकरीच्या ठिकाणी कारने सोडून देतो आणि घ्यायला सुध्दा येतो. हे यापूर्वी अनेकदा वाचले आणि पाहिले सुध्दा आहे. मात्र, केवळ चोऱ्या करण्यासाठी जाताना पत्नीला ती सांगेल त्या गावात किंवा शहरात कारने सोडून द्यायचे आणि तिची चोरी करून झाली की परत अमरावतीला घेवून यायचे, अशी 'पत्नीसेवा' करणाऱ्या पतीला चोर पत्नीसह अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ही चोरी करणारी महिला इतकी अट्टल आहे की, तिने मागील नऊ महिन्यांत अमरावती जिल्ह्यात केलेल्या 23 चोऱ्या घरफोडींची कबुली दिली आहे. याव्यतिरिक्त अजूनही काही गुन्हे तिच्याकडून उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सीमा ऊर्फ हेमा परवीन शेख नसीम (35) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे तर शेख नसीम शेख सलीम असे तिच्या पतीचे नाव आहे. दोघेही अमरावतीच्या सादियानगरमध्ये राहतात. सीमाचे पूर्वाश्रमीचे नाव हेमा बोयत असून तिच्याविरुद्ध शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी तिला शहर पोलिसांनी चोरीमध्येच अटक केली होती. दिवसाढवळ्या उघड्या घरात प्रवेश करून चोरी करण्यात ती पटाईत आहे.
विशेष म्हणजे ती रात्रीच्या वेळी चोरी न करता केवळ दिवसा चोऱ्या करते. यातही बहुतांश चोऱ्या या उघड्या घरात प्रवेश करून करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील नऊ महिन्यांत तिने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, परतवाडा, चांदूरबाजार, वरूड, मोशी, शिरखेड, दत्तापूर, तळेगाव दशासर आणि तिवसा पोलिस ठाणे परिसरात चोऱ्या, घरफोडीचे गुन्हे केले आहे.
दर दोन ते तीन दिवसांनी ती सकाळी दहा ते अकरा वाजता अमरावतीतून कारने पतीला घेवून निघायची. चोऱ्या कोणत्या शहरात किंवा गावात करायच्या, हे ती स्वत:च ठरवत होती. त्या पध्दतीने पतीला सांगायची की मला संबंधित गावात, शहरात सोडून द्या आणि काम झाल्यानंतर त्याच ठिकाणी घ्यायला यायचे. त्यानुसार पती तिला सोडून द्यायचा. त्यानंतर ती बिनधास्त चोरी करायची आणि परत कारमध्ये बसून अमरावतीत परत यायची. ग्रामीण पोलिसांच्या सुमारे तीन आठवड्याच्या मेहनतीमुळे हे अट्टल चोर जोडपं पोलिसांच्या हातात आले आहे.
पोलिसांनी एक घरफोडी दरम्यान एका सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेची ओळख पटवली. कारण ही महिला चालताना थोडी लंगडत चालायची, त्याच आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी या बंटी-बबलीच्या घरातून तब्बल 9 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement