घराणेशाहीवरून राजकारण तापलं! रोहित पवार म्हणाले, देशात 70 टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये, सुजय विखे म्हणतात, त्यांनी हे बोलणं म्हणजे मोठा विनोद
Rohit Pawar vs Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर सडकून टीका केली होती. यावरून रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्यात जुंपली.
Ahmednagar News अहमदनगर : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर जोरदार केली जात आहे. या प्रचारात घराणेशाहीचा (Dynasticism) मुद्दादेखील समोर येताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देखील प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर सडकून टीका केली होती. या मुद्द्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहे. यावरून आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यात जुंपल्याचे दिसून आले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.
70 टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये - रोहित पवार
घराणेशाहीच्या मुद्द्यावरून रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सध्या देशभरात जे खासदार आहेत. त्यातील 70 टक्के घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्ये असल्याची टीका, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे घराणेशाहीतील आहेत. अशी 70 ते 80 नाव सांगता येतील, असं रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटले आहे. सोबतच भाजपचे भाषणातील मुद्दे वेगळे असतात त्यातच खोटं बोल पण रेटून बोल, अशी स्थिती असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवारांनी या विषयावर बोलणे म्हणजे मोठा विनोद - सुजय विखे पाटील
तर भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. सुजय विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला एखाद्या कारणाने तिकीट मिळू शकते. पण शेवटी जनतेच्या मतांवरच उमेदवार निवडून येतो. सध्या जी घराणे राजकारणात टिकली आहेत ते केवळ जनतेने दाखवलेल्या विश्वासावर टिकली आहेत. कुणीही ते जनतेवर लादलेली नाहीत. त्यातच रोहित पवारांनी या विषयावर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे. कारण त्यांच्या घरातील एका खोलीत सर्व लोक बसवले तर पूर्ण पक्षच एका घरात बसेल, असा खोचक टोला सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांना लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या