Sujay Vikhe : अहमदनगरमध्ये यूट्यूब मुलाखतीवरून राडा, सुजय विखेंना थेट जीवे मारण्याची धमकी; झेड सुरक्षा देण्याची कार्यकर्त्यांची मागणी
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : नगरमध्ये दोन कार्यकर्त्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर एकाने सुजय विखेंना थेट जीवे मारण्याची धमकीच दिली आहे. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
अहमदनगर : नगर लोकसभा मतदारसंघात काही स्थानिक पोर्टल आणि यू ट्यूब चॅनेलने घेतलेल्या मुलाखतींवरून मोठा राडा होत असल्याचं दिसतंय. गावात कोणाची हवा आहे अशा आशयाचा कंटेंट दाखवल्यानंतर त्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये तणाव निर्माण होत असल्याचं दिसतंय. त्यातच रविवारी दोन कार्यकर्त्यांमध्ये फोनवरून झालेल्या संवादाची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली असून त्यात भाजप उमेदवार सुजय विखेंवर (Sujay Vikhe) गोळ्या झाडणार असल्याचे संभाषण ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी सुजय विखेंच्या समर्थकांनी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि आरोप-प्रत्यारोपण सुरू झाले. मात्र अहमदनगर लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप एवढे टोकाला गेले की प्रकरण थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांपर्यंत गेले. रविवारी पारनेर तालुक्यातील दोन कार्यकर्त्यांमध्ये फोनवरून झालेल्या संवादाची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे.
सुजय विखेंना जीवे मारण्याची धमकी
या क्लिपमध्ये पारनेर तालुक्यातील एका गावातील उपसरपंचास दुसरा व्यक्ती जाब विचारत आहे.तुझ्या गावात डॉ. सुजय विखे यांना 60 टक्के मते मिळतील अशी मुलाखत तू कशी दिली? हा आकडा तू कशाच्या आधारे सांगितला? असा जाब त्यात विचारला जात आहे. या क्लिपमध्ये भाजप उमेदवार सुजय विखे यांच्याबाबत आक्षेपार्ह शिवीगाळही करण्यात आली आहे. सोबतच डॉ. सुजय विखे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
कथित ऑडिओ क्लिपमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव निवृत्ती गाडगे, तर ज्याला धमकी दिली त्याचं नाव गणेश काने असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही.
सुजय विखेंना झेड सुरक्षा द्या
या प्रकरणी सुजय विखेंच्या समर्थकांनी थेट पोलीस अधीक्षकांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले आहे. सोबतच सुजय विखेंना झेड सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व घटनेच्या मागे नेमकं कोण आहे याचा सविस्तर तपास करून मुख्य सूत्रधारावर कारवाईची मागणी होत आहे.
निलेश लंकेंच्या कार्यालयाकडून खुलासा
मात्र क्लिप व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके यांच्या कार्यालयाने खुलासा केला आहे. या क्लिपमध्ये निवृत्ती गाडगे नावाची व्यक्ती दमबाजी करतानाचे संवाद आहेत. ती व्यक्ती शिवसेना एकनाथ शिंदे गटातील आहे. त्या व्यक्तीचा आणि निलेश लंके यांचा काहीही संबंध नाही. निवृत्ती गाडगे यांची एक व्हिडीओ मुलाखतही लंके यांच्या कार्यालयाकडून माध्यमांना पाठवण्यात आली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये गाडगे ही व्यक्ती 'मी शिंदे गटाचे मुंबईत काम करतो. माझ्या नावाने जी क्लिप व्हायरल झाली ती खोटी आहे. निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादीशी माझा संबंध नाही. माझी खोटी क्लिप ज्यांनी व्हायरल केली त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे' असे सांगत आहेत.
दरम्यान, व्हायरल झालेली क्लिप नेमकी कुणाची? विखे यांना धमकी देणारी व्यक्ती कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या क्लिपबाबत अद्याप पोलिसामध्ये तक्रार देण्यात आली नाही. मात्र संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी करत विखे समर्थकांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले आहे. थेट उमेदवारावर गोळ्या झाडू असा उल्लेख या क्लिपमध्ये असल्याने नगर लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा: