Ahmednagar : 40 माणसांना दिलं चक्क जनावरांचं इंजेक्शन, पाथर्डीतील बोगस डॉक्टराचे कृत्य
Ahmednagar Bogus Doctor : बोगस डॉक्टरने जवळपास 40 हून अधिक लोकांना जनावरांची इंजेक्शन दिल्याचं समोर आलं.
![Ahmednagar : 40 माणसांना दिलं चक्क जनावरांचं इंजेक्शन, पाथर्डीतील बोगस डॉक्टराचे कृत्य Ahmednagar news 40 people were given animal injections the act of a bogus doctor in Pathardi Ahmednagar : 40 माणसांना दिलं चक्क जनावरांचं इंजेक्शन, पाथर्डीतील बोगस डॉक्टराचे कृत्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/ca18b6996150d780fb49380bdd3c4a06166265837447293_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : डॉक्टर असल्याचे सांगत एका व्यक्तीने गेल्या दोन दिवसापासून माणसांना जनावरांचे औषध वापरून इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथे हा प्रकार घडला आहे. या बोगस डॉक्टराने (Ahmednagar Bogus Doctor) जवळपास 40 हून अधिक महिला आणि पुरूषांना इंजेक्शन दिल्याचं स्पष्ट झालं आहे. राजेंद्र जवंजळे असं या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या बोगस डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांनी पकडले आणि त्याला तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या बोगस डॉक्टरवर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसगाव येथे या बोगस डॉक्टराच्या (Ahmednagar Bogus Doctor) बॅगेतील औषधांची खातरजमा झाल्यानंतर त्याला पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं. करंजी जवळील खंडोबावाडी येथे गेल्या दोन दिवसापासून राजेंद्र जवंजळे हा डॉक्टर म्हणून आला होता. त्याने तिथल्या काही व्यक्तींना मान, गुडघा आणि पाठदुखीवर उपचार करत त्यावर इंजेक्शन दिले. ज्या ठिकाणी दुखत आहे त्याच ठिकाणी इंजेक्शन देऊन प्रत्येकाकडून पाचशे रुपये उकळले.
गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या गावातील लोकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत होता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्हं आढळून आली आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागानेही तातडीने संबंधित उपचार घेतलेल्या लोकांची तपासणी सुरू केली असून कुणाला काही त्रास होत असल्यास आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलंय. तसेच अशा पद्धतीने कुणी बोगस डॉक्टर निदर्शनास आल्यावरही आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)