Ahmednagar : इगतपुरीच्या मुलांची अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी विक्री? पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर
Ahmednagar News Update : इगतपुरी येथील मुलांची अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी मुलांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलीस समोर आली आहे. यात मुलांना मारहाण झाल्याचे देखील समोर आले आहे.
अहमदनगर : इगतपुरी येथील पाच अल्पवयीन मुलांकडून पारनेर तालुक्यात वेठबिगारी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरिबीचा आणि कमी वयाचा गैरफायदा घेऊन वेठबिगारी करून घेतल्याबाबतची फिर्याद संगमनेर पोलिसात दाखल झाली होती. इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील बाबुराव सिताराम भोईर यांनी संगमनेर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी तपास केला असता अल्पवयीन मुलांना मारहाण झाल्याचेही समोर आले आहे. मागील तीन वर्षापासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. ज्या अल्पवयीन मुलांना पारनेरमध्ये पाठवण्यात आले होते त्यांच्याकडून मेंढपाळीचा व्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.
पालकांकडून मुलांची विक्री?
दरम्यान, पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या पालकांनीच मुलांची विक्री केल्याचा संशय निर्माण झाला आहे. मात्र पोलीस तपासात याबाबतचे तथ्य समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रत्येकी पाच हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात विक्री
पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणी खूपच धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरच्या मुलांची खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गौरी आगिवले या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस तपासातून हे रॅकेट उघड झाले आहे. आतापर्यंत अशा जवळपास 30 मुलांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील सहा मुले सापडली असून 24 मुले अद्याप बेपत्ता आहेत.
याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव, संगमनेर तालुका आणि पारनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत. एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत चौकशी केली असता या गुन्ह्यातील मुलांबाबत त्यांना माहिती मिळाली होती. दरम्यान, या गुन्ह्यात मोठे रॅकेट काम करत असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या