Parbhani Crime : 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण; निषेध म्हणून सेलु बंदची हाक, सामाजिक संघटनाचा मोर्चा
Parbhani Crime News : परभणीच्या सेलुतील 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Parbhani Crime News : परभणीच्या (Parbhani News) सेलूत (Selu Crime News) घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ आज सेलू (Selu) बंदची हाक देण्यात आलेली आहे. सकाळपासून सेलुतील बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी सामाजिक संघटनांच्या वतीनं दुपारी बारा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या वतीनं आज या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाभरातील नाभिक समाजातील प्रतिष्ठान बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला जाणार आहे.
चिमुरडीवर अत्याचार करणारे नराधम अटकेत
परभणीत 10 वर्षीय चिमुकलीवर दोन नराधमांनी अत्याचार केले. याच घटनेच्या निशेधार्थ आज सेलू बंदची हाक देण्यात आली आहे. 10 वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीवरुन घेऊन जात, तिच्यावर दोघांनी अत्याचार केला होता. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 48 तासांनी नराधमांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. चिमुकलीवर अत्याचार करणारे दोन्ही नराधम चारठाणा येथील रहिवाशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघंही फरार होते. यामुळं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. अखेर दोन्ही नराधमांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं.
काय घडलं त्या दिवशी?
5 सप्टेंबर रोजी, सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास शहरातील एका भागातून दहा वर्षीय बालिका आणि दहा वर्षीय तिचा मावसभाऊ हे दोघे आपल्या घराकडे येत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी त्या दोघांना मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवले. या बालिकेच्या मावस भावास एका रस्त्यात सोडून देत 10 वर्षीय बालिकेस घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आणि तिथेच सोडून दिले. या प्रकरणात पीडित बालिकेच्या आईने सेलू पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून 2 अज्ञात आरोपींविरुद्ध पोक्सोसह विविध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, परभणीतील सेलूमध्ये भर दिवसा अशा प्रकारे चिमुकलीला घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संपूर्ण परभणीत संतापाची लाट उसळली आहे. चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या केल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.