Nagpur Crime : तीन दिवसानंतर उघडकीस आली गोळीबारची घटना; आरोपी यश शर्मा तुरुंगात, आनंद ठाकूरवरही गुन्हा दाखल
विवेकानंदनगर गोळीबार तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे आयुक्तांनी धंतोलीचे पोलीस निरीक्षक व दुय्यम निरीक्षकांना तत्काळ प्रभावाने नियंत्रण कक्षात हलविले आहे. तसेच या घटनेचा तपास उपायुक्तांकडे सोपविला आहे.
नागपूरः दोन गटांत झालेल्या वादात गोळीबार झाल्याच्या घटनेचे मूळ कारण एक तरूणीशी असलेली मैत्री असल्याची बाब समोर आली आहे. या मुलीवरून यश शर्मा आणि आनंद ठाकूर यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे यश शर्माने आनंद ठाकूरवर गोळीबार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान आरोपी यश शर्माने पिस्तुलाऐवजी एअरगनने गोळीबार केला असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी यशकडून एअर गन जप्त केली आहे.
ही घटना 26 जून रोजी रात्री विवेकानंदनगर येथे घडली होती. या घटनेबाबत आनंद ठाकूरने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास व पाहणी केल्यानंतर दोन्ही गटांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला. तक्रार दिल्यावरही कारवाई झाली नसल्याने आनंद ठाकूर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे या घटनेची तक्रार केली. पीलस आयुक्तांच्या सूचनेवरून धंतोलीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण आणि दुय्यम निरीक्षक मडावी यांची तात्काळ प्रभावाने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. बुधवारीच पोलिसांनी यश शर्मासह सात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. यश शर्माशिवाय त्याचे वडील राजकुमार शर्मा, काका अनिल शर्मा, विकास शर्मा, सौरभ कुलकर्णी, अमन आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. पोलिसांनी यश शर्मालाही अटक केली आहे. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने आनंद ठाकूर यांच्यावर तलवारीने वार केल्याचा दावा यशच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ठाकूरवर यापूर्वीही प्राणघातक हल्ला, अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरूणांसोबत राहतो. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. ते एकमेकांना बघून घेण्याची धमकी देत होते. दरम्यान धंतोली पोलिसांनी यश शर्माला आज न्यायालयात हजर केले. तेथून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
तपास उपायुक्तांकडे
धंतोली पोलिसांनी कारवाईत हलगर्जीपणा केल्याने हा तपास सहायक पोलीस उपायुक्त माधुरी बाविस्कर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. याप्रकरणी डीबी पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासात निष्काळजीपणा केल्याचे बोलले जात आहे. डीबी टीमचे म्हणणे आहे की, त्यांना घटनास्थळी गोळीबार झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.
जुनाच वाद
यशचा काही दिवसांपासून नंदनवन येथील रहिवासी आनंद ठाकूरसोबत वाद सुरू आहे. दोघे पूर्वी मित्र होते. परंतु त्यांच्यात वाद विकोपाला गेला होता. रविवारी रात्री आनंद आपला मित्र प्रिन्स आणि इतर साथीदारांसोबत यशच्या विवेकानंदनगर येथील कार्यालयात गेले. तेथे दोन्ही गटात मारहाण झाली असल्याची चर्चा होती.