Relationship Tips : 'असला जोडीदार नको गं बाई!' तुमच्यासाठी योग्य जोडीदार कसा ओळखाल? लग्नानंतर सुखी आयुष्य हवंय? हे संकेत जाणून घ्या,
Relationship Tips : लग्नानंतरचं आयुष्य सुखी राहण्यासाठी योग्य जीवनसाथी निवडणे हा जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होतो.
Relationship Tips : हिंदू धर्मात विवाहाला अत्यंत महत्त्व आहे. मात्र बदलत्या काळानुसार आजकाल पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब होत असल्याने वैवाहिक जीवनाला तितकं महत्त्व काही जण देत नाही. एकमेकांमध्ये परस्पर मतभेद, विचार न जुळणे, एकमेकांचा आदर न करणे अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आजकाल घटस्फोटाचे देखील प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच लग्नानंतरचं आयुष्य सुखी राहण्यासाठी योग्य जीवनसाथी निवडणे हा जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होतो. आज आम्ही तुम्हाला योग्य जोडीदाराची काय लक्षणं असायला हवीत याबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जोडीदार निवडण्यासाठी मदत होऊ शकते.
चुकीचा जोडीदार निवडला गेला, तर...
योग्य जीवनसाथी तुमच्यासोबत एक आनंदी कुटुंब तयार करतो, ज्यामध्ये तुमच्या दोघांची ध्येये समान असतात. तो तुमच्यासोबत प्रत्येक सुख-दु:ख शेअर करतो, तसेच तुमची स्वप्ने साकार करण्यात मदत करतो. मात्र, आयुष्यभर तुमच्यासोबत राहण्यासाठी चुकीचा जोडीदार निवडला गेला, तर आयुष्यात अडचणी येऊ लागतात. कुटुंब सुखापेक्षा समस्या, दु:ख आणि वादांनी वेढलेले असते. अशात लग्नानंतरच्या सुखी आयुष्यासाठी स्वतःसाठी योग्य जीवनसाथी निवडणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यासाठी कोणती व्यक्ती उत्तम जीवनसाथी असू शकते हे शोधणे कठीण असले तरी काही लक्षणं पाहून तुम्हाला योग्य जीवनसाथीमध्ये काय असावे आणि काय नसावे हे समजू शकेल.
केवळ देखावा नव्हे तर चारित्र्य चांगले हवे
अनेकदा लोक जोडीदाराची निवड करताना त्यांच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. तुमचा जोडीदार फक्त त्याच्या/तिच्या दिसण्यावर आधारित निवडू नका, तर त्याचे/तिचे व्यक्तिमत्व समजून घ्या आणि तो/ती तुमचा जीवनसाथी बनण्यास पात्र आहे की नाही हे ठरवावे. तुमचा जोडीदार आकर्षक आणि चांगला दिसत असला तरीही, जर त्याच्या/तिच्या वाईट सवयी असतील तर आयुष्यभर त्याच्याशी/तिच्याशी सुसंवाद राखणे कठीण होईल. म्हणून, केवळ दिसण्याकडेच नाही तर चारित्र्याकडेही पाहा.
वागणूक
लग्नाचा निर्णय घेताना तुमच्या जोडीदाराच्या वर्तणुकीबद्दल जरूर जाणून घ्या. लग्नापूर्वी त्यांच्यासोबत वेळ घालवा, जेणेकरून तो किंवा ती कसे वागतात हे तुम्हाला कळेल. तो शांत माणूस आहे की बोलणारा? कोणत्याही समस्येच्या वेळी ते कसे वागतात आणि आयुष्याबद्दल ते किती सकारात्मक आहेत हे जाणून घेतल्यावरच, तुम्ही त्यांच्यासोबत आयुष्यभर जगू शकता की नाही हे ठरवा.
समान कल्पना आणि ध्येय
योग्य आणि चांगला जीवनसाथी निवडण्यासाठी तुमच्या दोघांमध्ये काही साम्य असणे गरजेचे आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, एखादी व्यक्ती स्वतःहून भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीकडे अधिक आकर्षित होते, परंतु त्या दोघांसाठी समान कल्पना किंवा ध्येय असणे आवश्यक आहे. जरी विचार पूर्णपणे जुळत नसले तरी, काही समानता किंवा स्वारस्य असले पाहिजे, जेणेकरून आयुष्यभर वैचारिक मतभेद होणार नाहीत.
आदर देखील महत्वाचा
ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे, तिच्याबद्दल तुमचा आदर असायला हवा. नात्यात आदर आणि विश्वास या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तुमचा पार्टनर तुमचा आदर करतो की नाही हे तपासा.
जीवनशैली किंवा स्टॅंडर्ड
लग्न हे एक-दोन दिवसांचे नसते, आयुष्यभराची साथ असते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या दोघांच्या जीवनशैलीत किंवा स्टॅंडर्डमध्ये खूप फरक असेल तर त्यांना समान पातळीवर आणणे किंवा समान जीवनशैली जगणे कठीण होते. तुमच्या जोडीदाराशी तसेच तुमच्या कुटुंबाशी समन्वय राखणे कठीण होऊ शकते. म्हणूनच, असा जोडीदार निवडा ज्याची जीवनशैली आणि स्टॅंडर्ड तुमच्यापेक्षा फारशी वेगळी नाहीत.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Relationship Tips : लग्नापूर्वी 'हे' 6 प्रश्न तुम्ही तुमच्या भावी पतीला जरूर विचारा, नंतर भविष्याचा निर्णय घ्या