Health: कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता Lassa Fever? उंदरांद्वारे पसरणारा एक दुर्मिळ संसर्ग, 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना?
Health: हा एक दुर्मिळ संसर्ग आहे, जो उंदरांद्वारे पसरतो. याची प्राथमिक लक्षणं, प्रतिबंध आणि उपचार पद्धती जाणून घ्या.
Health: गेल्या काही वर्षात कोरोना व्हायरसने (Corona Virus) अवघ्या जगभरात थैमान घातल्याचं आपण सर्वांनी पाहिलं, कोरोनानंतर जगभरात विविध संसर्ग पसरत असल्याचं समोर येतंय. कोविडचे अनेक व्हेरिएंट देखील देशाच्या विविध भागात थैमान घालत आहेत. काही दिवसांपूर्वी मंकीपॉक्सने लोकांची चिंता वाढवली होती. त्यानंतर आता लासा नावाचा नवीन तापही झपाट्याने पसरू लागला आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागात या नवीन विषाणूची चिंता वाढली आहे. झाले असे होते की, येथे एका संशयिताचा मृत्यू झाला, जो गेल्या महिन्यातच पश्चिम आफ्रिकेतून परतला होता. या तापाचा इथल्या भागात वाईट परिणाम होत आहे. मृत्यूनंतर करण्यात आलेल्या तपासणीनुसार, मृत व्यक्तीला लासा तापाची लागण झाल्याचे समोर आले. या आजाराबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
लासा फिव्हर म्हणजे काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लासा तापाचा विषाणू पश्चिम आफ्रिकेत उदयास आला. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, 1969 मध्ये लासा ताप हा नायजेरिया येथे प्रथम आढळला. नायजेरियामध्ये या आजाराने पीडित दोन परिचारिकांचा मृत्यू झाला, तेव्हा लोकांना या आजाराची माहिती मिळाली. तज्ज्ञांच्या मते हा आजार विषाणूजन्य ताप आहे. त्यामुळे अनियंत्रित रक्तस्रावासह ताप येतो. हा ताप सहसा संक्रमित उंदीर किंवा संक्रमित रुग्णाच्या संपर्कात पसरतो. याशिवाय प्रवासामुळे हा विषाणू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत असल्याचे समजते
लासा ताप कसा होतो?
लासा तापाचा विषाणू संक्रमित व्यक्तीचे मलमूत्र किंवा उंदरांच्या मूत्राच्या संपर्कात आल्याने पसरतो. हा विषाणू संक्रमित अन्न, पाणी, हवा किंवा संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून देखील मानवी शरीरात पसरू शकतो.
लासा तापाची सुरुवातीची लक्षणं
लासा तापाची लक्षणे सामान्यतः संसर्ग झाल्यानंतर 1 ते 3 आठवड्यांच्या आत दिसतात.
ताप
डोकेदुखी
स्नायू दुखणे
घसा खवखवणे
खोकला आणि थकवा
उलट्या आणि अतिसार
पोटदुखी
काही प्रकरणांमध्ये नाक, डोळे किंवा तोंडातून रक्तस्त्राव
लासा तापावर उपचार काय आहेत?
लासा तापावर उपचार आवश्यक आहेत आणि हे शक्य तितक्या लवकर सुरू केले पाहिजे. उपचार करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसे की-
अँटीव्हायरल औषधे- रिबाविरिन सारखी अँटीव्हायरल औषधे या आजारात फायदेशीर आहेत, परंतु लक्षणे दिसू लागताच ती घेणे महत्त्वाचे आहे.
हायड्रेशन- शरीरात पाणी, इलेक्ट्रोलाइट्स आणि बीपीची कमतरता नियंत्रित करणे देखील महत्त्वाचे आहे.
संसर्ग नियंत्रण- इतर लोकांना संक्रमित व्यक्तीपासून दूर ठेवले पाहिजे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन केले पाहिजे.
Lassa Fever कसा टाळाल?
- संक्रमित उंदरांपासून दूर राहा आणि त्यांच्याशी संपर्क टाळा.
- अन्न, पेय सुरक्षित आणि स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे.
- संक्रमित व्यक्तीपासून दूर रहा
- आरोग्य सेवेने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- घरात उंदीर न येण्याबाबत योजना करा, जेणेकरून ते आत येऊ शकणार नाहीत.
हेही वाचा>>>
Brain Tumor Awareness Week: झोपताना फोन डोक्याजवळ ठेवता? ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजारांपासून स्वतःचे रक्षण करा, या 7 टिप्स फॉलो करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )