Gudi Padwa 2023 : आजपासून 'शोभन नाम संवत्सर' मराठी नवीन वर्षाची सुरुवात; हे वर्ष कसं असेल? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...
Gudi Padwa 2023 : पंचांगकर्ते डॉ. मोहन दाते यांच्या म्हणण्यानुसार, या चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रम्हदेवाने सृष्टीला चालना दिली. आणि तिथून सगळं जीवन चैतन्य सुरु झालं.
Gudi Padwa 2023 : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक सण म्हणजेच, गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होत असते. आपल्याकडे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरु होतं. हे नवीन वर्ष आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरु झालं आहे. या वर्षाचं नाव आहे 'शोभन नाम संवत्सर'. भारतीय संस्कृतीत या प्रत्येक वर्षाला नाव दिलेलं आहे. आतापर्यंत जे वर्ष सुरु होतं ते शुभकृत होतं आणि आजपासून 'शोभन नाम संवत्सर' सुरु झालं आहे. येणारं हे वर्ष नेमकं कसं असेल याविषयी पंचांगकर्ते डॉ. मोहन दाते यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे.
पंचांगकर्ते मोहन दाते म्हणतात...
पंचांगकर्ते डॉ. मोहन दाते यांच्या म्हणण्यानुसार, या चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रम्हदेवाने सृष्टीला चालना दिली. आणि तिथून सगळं जीवन चैतन्य सुरु झालं. म्हणूनच या दिवसाला फार महत्त्व आहे. चालना दिल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सुर्योदय झाला तेव्हा दिवसाची सुरुवात होते. म्हणून गुढीपाडव्याला सुर्योदयाला गुढी उभारली जाते. गुढी हे विजयाचं प्रतिक आहे, आनंदाचं प्रतिक आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभी केली जाते. ही गुढी उभी करून तिचं पूजन करून त्यानंतर पंचांगावरच्या गणपतीचं पूजन केलं जातं. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने हे येणारं नवीन वर्ष सुख-समृद्धीचं जावं, संकटं दूर व्हावीत अशी प्रार्थना करून पूजन केलं जातं.
अनेक शुभकार्याची आजपासून सुरुवात
'संवत्सर (संवत) हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते. साडेतीन मुहूर्ताचा आजचा गुढीपाडव्याचा जो शुभ दिवस आहे. या दिवशी आपण अनेक प्रकारची कार्य, नवीन आरंभ, व्यवसाय अशा अनेक नवीन गोष्टी आपण सुरु करू शकतो.
नवीन वर्षात सहा गुरुपृष्यामृताचे योग
प्रत्येक वर्षाची काहीतरी वैशिष्ट्य असतात. शोभन नाम संवत्सर या नवीन वर्षाबाबत जर बोलायचं झालं तर यावर्षी सहा गुरुपृष्यामृताचे योग आहेत. या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात. असा हा योग यावर्षी सहा वेळा आहे. विशेष म्हणजे, एकही अंगारकी योग यावर्षी पंचांगात नाहीये. पण, 19 वर्षांनी आलेला श्रावण महिना यावर्षी अधिक आहे.
गेली दोन वर्ष साथीच्या रोगांची काही संकटं आली. मात्र, नवीन सुरु होणारं हे वर्ष शारिरीक आणि मानसिकरित्याही चांगलं जाणार आहे. एक स्थिरता या वर्षात आपल्याला लाभणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :