Gudi Padwa 2023 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
Gudi Padwa 2023 : गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो.
Gudi Padwa 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक, असे मानले जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यानुसार, काही जण या दिवशी सोनं खरेदी करतात, काही नवीन कार घेतात तर काही जण नवीन व्यवसायाला प्राधान्य देतात.
गुढी पाडवा 2022 तारीख आणि मुहूर्त (Gudi Padwa 2023 Muhurat and Date)
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच, गुढी पाडवा. यंदा गुढीपाडव्याचा सण 22 मार्च (बुधवारी) रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी 6.29 ते 7.39 हा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी सकाळी लवकर गुढी उभारली जाते. तसेच, सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करुन गुढी उतरवून ठेवली जाते.
गुढी पाडव्याचे महत्व (Importance Of Gudi Padwa 2023)
गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. त्याच वेळी, भारतातील विविध राज्यांमध्ये इतर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुंदर गुढी उभारून, तिची पूजा करतात. असे मानले जाते की, गुढी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
त्याचबरोबर काही लोक या दिवशी कडुलिंबाची पानेही खातात. यामागची धारणा अशी आहे की, यावेळी निसर्गात बदल होत असतो, त्यामुळे कडुलिंबाची कोवळी पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रोगांच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते आणि शरीर आतून मजबूत होते.
सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. याला गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) असेही म्हणतात. यामागे एक वैज्ञानिक दृष्टीकोनही आहे. यावेळीशरद ऋतूनंतर वसंत ऋतू सुरु होतो. झाडांना कोरड्या पानांच्या जागी नवीन हिरवी पाने येऊ लागतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या तिथीला विश्वाची निर्मिती केली. यामुळेच सनातन धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नववर्ष साजरे केले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :