तारक मेहताचे लेखक अभिषेक मकवाना यांची आत्महत्या
अभिषेक मकवाना यांनी मुंबईत आपल्या रहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 27नोव्हेंबरला हा प्रकार झाल्याचं कळतं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी एक पत्रही लिहून ठेवल्याचं कळतं.
मुंबई : टीव्ही इंडस्ट्री अशा खूप कमी मालिका आहे ज्या अनेक वर्ष चालू आहेत आणि त्यांनी रसिक मनावर छापही उमटवली आहे. एकिकडे सास-बहू ड्रामा चालू असताना एका मालिकेने मात्र संपूर्णपणे आपली वेगळी वाट पकडली. त्या मालिकेचं नाव आहे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेची चर्चा नेहमीच होत असते. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे ही मालिका चर्चेत आली आहे. कारण, या मालिकेच्या एका लेखकाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनं अनेक वर्षं रसिकांचं मनोरंजन केलं. ही मालिका आणि या मालिकेची टीम मोठी आहे. या मालिकेसाठी काही दिग्दर्शक काम करतात तसेच एक नव्हे, तर अनेक लेखक ही मालिका लिहित असतात. शो मस्ट गो ऑन ही उक्ती लक्षात घेऊन एकाला एक पर्याय असावा म्हणून अनेक लेखक या मालिकेसााठी काम करत असतात. त्यातलेच एक लेखक होते अभिषेक मकवाना. अभिषेक मकवाना तसे शांतवृत्तीचे होते. पण अचानक त्यांनी मुंबईत आपल्या रहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 27नोव्हेंबरला हा प्रकार झाल्याचं कळतं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी एक पत्रही लिहून ठेवल्याचं कळतं.
अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने टीव्ही इंडस्ट्रीत पुन्हा एकदा हळहळ व्यक्त होतं आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचं नेमकं कारण पत्रात नमूद केलेलं नाही. पण त्यापलीकडे त्यांच्या कुटुंबियांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या जास्त भयंकर आहेत. खरंतर अभिषेक गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. एका सायबर घोटाळ्यात ते अडकले होते. सायबरद्वारे त्यांची आर्थिक फसवणूक झाली होती. त्यानंतर ते सतत तणावात होते. शिवाय त्यांना याबद्दल अनेकदा फोनही येत होते. पण त्याबद्दल त्यांनी कधी थेट वाच्यता केली नव्हती. अभिषेक यांनी अचानक असं पाऊल उचलल्यानंतर मात्र सगळेच धास्तावून गेले आहेत.