(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sreenivasan : मल्याळम सुपरस्टार श्रीनिवासन यांची प्रकृती चिंताजनक, बायपास सर्जरीनंतर व्हेंटिलेटरवर
Sreenivasan Health Update : मल्याळम चित्रपटविश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या श्रीनिवासन यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Sreenivasan : प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते श्रीनिवासन (Actor Sreenivasan) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीनिवासन यांना 30 मार्च रोजी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर 31 मार्च रोजी त्यांच्यावर इमर्जन्सी बायपास सर्जरी करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे, त्यामुळे त्यांना स्थिर करण्यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार श्रीनिवासन ट्रिपल वेसल डिसीजने त्रस्त आहेत.
श्रीनिवासन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त समजताच, ते लवकर बरे व्हावेत, म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. मल्याळम चित्रपटविश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या श्रीनिवासन यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता असण्यासोबतच ते एक लोकप्रिय पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहेत.
50 वर्षांच्या कारकिर्दीत श्रीनिवासन यांनी मोहनलाल यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. 1976 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या श्रीनिवासन यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये 'गांधीनगर 2 स्ट्रीट', 'वरावेलपू' आणि 'नाडोडीकट्टू' या चित्रपटांचा समावेश आहे. श्रीनिवासन यांच्या पश्चात पत्नी व्यतिरिक्त विनीत आणि ध्यान ही दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.
‘या’ चित्रपटांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार
श्रीनिवासन यांच्या 1989 मध्ये रिलीज झालेल्या 'वडक्कुनोक्कियंत्रम' (Vadakkunokkiyanthram) या चित्रपटाला केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. यासोबतच 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'चिंताविष्टय श्यामला' (Chinthavishtayaya Shyamala) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांचा हा चित्रपट सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा :