Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
Israel vs Iran War: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक देशांमध्ये उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Israel vs Iran War: इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, इराणने दुबईसह अनेक देशांवर हल्ले केल्यानंतर जगभरातील प्रवाशांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. हल्ल्यानंतर अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
यामुळे दुबईला फिरण्यासाठी गेलेले अनेक प्रवासी तेथे अडकून पडले होते. अशा परिस्थितीत काल रात्री सुमारे दोन वाजता दुबईहून एक फ्लाइट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी एका प्रवाशाने आपला थरारक अनुभव सांगितलाय.
Israel vs Iran War: भारतामध्ये आल्यानंतर प्रवाशाने काय सांगितले?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अजय नावाच्या एका प्रवाशाने माध्यमांशी संवाद साधला. अजय यांनी सांगितले की, आम्ही मुंबईहून हैदराबाद आणि तेथून दुबईला पोहोचलो होतो. दुबईहून आमची पुढील फ्लाइट अमेरिकेसाठी होती. आम्ही सर्वजण विमानात बसलोही होतो.
त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा विमानाने उड्डाण घेतले नाही तेव्हा चौकशी करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे 7-8 तास निघून गेले. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सध्या उड्डाण करता येणार नाही.
Israel vs Iran War: एअरपोर्टवर उडाली होती धावपळ; प्रवाशांची माहिती
अजय यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर विमानतळावर मोठी धावपळ उडाली. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर एमिरेट्सच्या बसेस आणि गाड्या विमानतळावर आल्या आणि आम्हाला हॉटेलपर्यंत सोडण्यात आले. मात्र त्यानंतरही आम्ही संपूर्ण रात्र हॉटेलच्या शोधात भटकत राहिलो.
त्यांनी पुढे सांगितले की, 10-12 तास भटकल्यानंतर आम्हाला एक हॉटेल मिळाले. या दरम्यान आम्ही बॉम्बस्फोटांचे आवाजही ऐकले. तसेच बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोटही पाहिले. या काळात आम्हाला हॉटेलमधून बाहेर पडण्यास आणि खिडक्यांजवळ उभे राहण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. आम्ही जेवण न करता फक्त आमच्या खोलीतच थांबत होतो. बाहेर नेमके काय सुरू आहे, याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. तेथे मोठी गोंधळ उडाला होता. हॉटेलमध्ये जागा न मिळाल्यामुळे अनेकजण जिथे जागा मिळेल तिथे राहत होते, असे त्यांनी म्हटले.
Israel vs Iran War: दुबईत सध्या कशी आहे परिस्थिती?
अजय यांनी दुबईतील सध्याच्या परिस्थितीबाबत सांगितले की, आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र दोन दिवस परिस्थिती अत्यंत गंभीर होती. आता तेथील लोक थोडे निश्चिंत झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या फ्लाइटची माहिती मिळताच आम्ही एमिरेट्सकडे विनंती केली. त्यानंतर आम्हाला वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आणि आम्ही आमची फ्लाइट पकडली, असे माहिती त्यांनी दिली.
आणखी वाचा
























