Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
Iran Israel War Impact on India : युद्धाचे बॉम्ब जरी पश्चिम आशियात फुटत असले तरी त्याची धग मात्र भारतात जाणवू लागली आहे. भारताच्या आयात आणि निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.

मुंबई : इस्त्रायल आणि इराण युद्धाचे चटके आता फक्त पश्चिम आशियालाच नव्हे तर जगभरात बसताना दिसून येत आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशाला त्याचे अधिकच नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. युद्धाला तोंड फुटून चारच दिवस झालेत तर त्याची झळ आता देशातील सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसताना दिसत आहे.
भारत आणि इराण हे जुने मित्र. प्राचीन काळापासून या दोन देशांमध्ये व्यापारी संबंध आहेत, आताही ते सुरू आहेत. परंतु इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि त्याचा परिणाम आता जगाला बसताना दिसतोय. भारतासारख्या अनेक देशांचा काहीही संबंध नसताना त्याचा फटका बसतोय.
भारतीय व्यापारावर काय परिणाम?
भारताचा पश्चिम आशियाशी होणारा मोठा व्यापार हा हॉर्मुजच्या सामुद्रधुनीच्या मार्गे होतो. या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आहे. आता युद्धामुळे इराणने ही सामुद्रधुनी बंद केली आहे. परिणामी भारताचा जवळपास 50 टक्के व्यापार हा प्रभावित होण्याची शक्यता आहे. या सामुद्रधुनीच्या मार्गे भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. जर इतर मार्गे व्यापार करायचा ठरवला तर जहाजांचा विमा प्रिमियम वाढतो, मालवाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम हा आयात-निर्यातीवर होऊ शकतो.
दुसरं म्हणजे इराणमधील चाबाहार बंदर भारत विकसित करत आहे. या बंदराच्या माध्यमातून इराण, रशिया तसेच पश्चिम आशियातील अनेक देशांशी भारताचा व्यापार सुकर होतो. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे या व्यापारावर सध्या परिणाम होणार आहे.
भारत इराणमधून काय आयात करतो?
कच्चे तेल - इराण- इस्त्रायल युद्धामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणार होणार आहे. भारताने इराणकडून आयात करण्यात येणाऱ्या तेलाचे प्रमाण जरी कमी केलं असलं तरीही याचा परिणाम मोठा होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला तर देशांतर्गत इंधनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे युद्ध जर दीर्घकाळ सुरू राहिलं तर घरगुती वापराचा एलपीजी गॅस महागणार असून पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पेट्रोकेमिकल आणि रासायनिक खते - इराण हा रासायनिक खतांचा मोठा उत्पादक देश आहे. पश्चिम आशियातील देशांकडून भारत मोठ्या प्रमाणावर खते आयात करतो. युद्ध जर दीर्घकाळ सुरू राहिलं तर खतांच्या किमतीत 30 ते 40 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुकामेवा आणि फळे - इराणमधून भारत सुकामेवा, खजूर, काजू, बदाम पिस्ता आयात करतो. या युद्धामुळे भारतात आयात होणाऱ्या सुकामेव्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आणि वाशी मार्केटमध्ये सुक्या मेव्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय.
कडधान्य महागण्याची शक्यता - भारतात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या डाळी आणि कडधान्यांच्या आयातीला या युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारताच्या निर्यातीवर काय परिणाम ?
कांद्याची निर्यात ठप्प
या युद्धामुळे भारतातील पश्चिम आशियाला होणाऱ्या कांद्याची निर्यात ठप्प झाल्याचं दिसून येतंय. त्याचा फटका विशेषतः नाशिकला बसल्याचं दिसतंय. नाशिकमधील पश्चिम आशियाला जाणारे कांद्याचे सुमारे 160 कंटेनर हे मुंबई बंदरावर अडकले आहेत.
कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने देशांतर्गत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होणार असून त्याचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसणार आहे.
केळी निर्यात ठप्प
भारतातून पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात केली जातात. एकट्या जळगावमधून पश्चिम आशियात 12 कंटेनर केळी आखाती देशात निर्यात केली जातात. ती निर्यात आता थांबल्याचं चित्र आहे. त्यामुळे केळांच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
जळगाव केळी निर्यात
जळगावमधून रोज 12 कंटेरन केळी आखाती देशात जातात, ती निर्यात आता थांबली आहे. युद्धापूर्वी केळी ही 2500 रुपये प्रति क्विंटल इतकी होती, आता ती 1500 रुपयांवर आली आहेत. केळी हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
द्राक्ष निर्यातीला फटका
रमजानच्या महिन्यात भारतातील द्राक्षांच्या मागणीला पश्चिम आशियातून मोठी मागणी असते. ती आता ठप्प झाली आहे.
बासमती तांदूळ निर्यात थांबली
इराण हा भारताच्या बासमती तांदळाचा मोठा आयातक देश आहे. युद्धामुळे बासमती तांदळाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसल्याचं दिसून येतंय.
सोन्या चांदीच्या दरात वाढ
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोन्याचे दर 7 हजारांनी तर चांदीचे दर 20 हजारांनी वाढले आहेत. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिलं तर या दरात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
शेअर बाजारामध्ये घसरण
आखाती युद्धामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसतोय. भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 800 ते 900 अंकांनी घसरला आहे.
युद्ध जरी पश्चिम आशियामध्ये सुरू असलं तरी त्याचा फटका मात्र भारतासारख्या देशांना बसत आहे. युद्धखोर अमेरिका आणि इस्त्रायलने त्यांच्या फायद्यासाठी हे युद्ध सुरू केलं असलं तरी त्याचा फटका तर प्रत्यक्ष युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या भारतासारख्या देशांना बसतोय.
























