Siddharth Jadhav Sacred Games :फक्त पैसे नाही तर आदरदेखील हवा; 'सेक्रेड गेम्स' च्या ऑडिशननंतर सिद्धार्थसोबत काय झालेलं?
Siddharth Jadhav : बॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेला अनुभव सिद्धार्थ जाधवने सांगितला. सेक्रेड गेम्सच्या वेळी आलेला अनुभव चांगला नव्हता असेही त्याने सांगितले.
Siddharth Jadhav : मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी आपल्या अभिनयाच्या बळावर गाजवून सोडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने अल्पावधीत बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेली छोटीशी भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेला अनुभव सिद्धार्थ जाधवने सांगितला. सेक्रेड गेम्सच्या वेळी आलेला अनुभव चांगला नव्हता. आम्हाला फक्त पैसे नव्हे तर आदरदेखील हवा असे सिद्धार्थने सांगितले.
नेमकं काय झालं?
अभिनेता सिद्धार्थ जाधवने युट्युबर सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यावेळी त्याने स्ट्रगल, मराठी रंगभूमी-सिनेसृष्टी याबद्दल भाष्य केले. सिद्धार्थ जाधव याने आपल्या या मुलाखती दरम्यान बोलताना सांगितले की, सेक्रेड गेम्स मधील एका भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी ऑडिशन दिली. मी सीरिजसाठी निवडलोदेखील गेलो. त्यानंतर मानधनाबाबत बोलणं सुरू असताना त्यांनी अपेक्षेपेक्षा मानधनाची रक्कम अतिशय कमी सांगितली. त्यानंतर त्या व्यक्तीने मला अरे इतर मराठी कलाकार पण एवढ्या रक्कमेत काम करतात मग तुला काय अडचण आहे असे विचारले. पण मला पटलं नसल्याचे सिद्धार्थ जाधवने सांगितले. पैसा म्हणजे सगळं नाही, तुम्ही आदरही दिला पाहिजे. तुमच्या कामामुळे तुम्हाला पुढचं काम मिळतं असेही त्याने सांगितले.
सिद्धार्थ जाधवने 'सेक्रेड गेम्स'मधून बाहेर पडला का?
तू सेक्रेड गेम्स वेब सीरिज सोडली का, असा प्रश्न विचारल्यावर सिद्धार्थने सांगितले की, ती व्यक्तीरेखा काढून टाकण्यात आली. वेब सीरिजचे ड्युरेशन वाढलं होते. ती व्यक्तीरेखा काढून टाकणे हे एका अर्थाने बरंच झालं असल्याची भावना सिद्धार्थने व्यक्त केली. त्याबद्दल मला काहीही वाईट वाटत नसल्याचे त्याने म्हटले. तुम्हाला तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळतं, असेही सिद्धार्थ जाधवने सांगितले.
View this post on Instagram
सेक्रेड गेम्स या वेब सीरिजचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. या वेब सीरिजचे दोन सीझन आले होते. या वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांनीदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.