'भाऊचा धक्का', तन्वी की रूचिता? रितेश देशमुखनं नेमकं कुणाला झापलं? PROMO सोशल मीडियात व्हायरल
Ritesh Deshmukh Slams Tanvi and Ruchita: बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये पहिला ‘भाऊचा धक्का’ आज पार पडणार आहे.

Ritesh Deshmukh Slams Tanvi and Ruchita: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. नव्या सीझनची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे. या सीझनमधील कलाकारांनी पहिल्याच आठवड्यात धुरळा उडवला. रितेश देशमुख यांची होस्ट करण्याची हटके स्टाईल. तसेच 17 सदस्यांची टास्क खेळण्याची शैली, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. काही वेळेस टास्क तर काही वेळेस भावुक क्षणांमुळे एपिसोड्स गाजले. काही तासांत भाऊचा धक्का पार पडेल. भाऊच्या धक्क्यामध्ये सुपरस्टार रितेश देशमुख घरातील सदस्यांची पोलखोल करणार आहेत. तसेच बिग बॉस घरातील सदस्यांची कानउघडणी देखील करणार आहेत. दरम्यान, पहिल्याच भाऊच्या धक्क्याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख रूचिता जामदार आणि तन्वी कोलते यांची शाळा घेत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख आणखी कुणाची कानउघडणी करणार? हे काही तासांत समोर येईल.
पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी
शो सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडली. रूचीता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. स्विमिंग पूलवरून दोघांमध्ये शाब्दिक भांडण झालं होतं. संवादादरम्यान, रूचिताने तन्वीला "बिनडोक... तुझं तोंड शेणात घाल",असं आक्षेपार्ह विधान केलं होतं. अनेकांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच नेटकऱ्यांनी रूचिताला आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल झापलं. त्या एपिसोडची सोशल मीडियात सोशल मीडियात प्रचंड चर्चा झाली.
तन्वी कोलते तंटा क्वीन
भाऊच्या धक्क्याच्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख तन्वी कोलतेवर चांगलेच चिडलेले दिसत आहेत. "तन्वी कोलते तू किती बोलते. तु्म्ही या घराच्या तंटा क्वीन आहात", असं तन्वीच्या वागण्यावर रितेश देशमुख याने टीका केली. "तिला फक्त बोलायचं आणि भांडायचं असतं, ते झालं की मग रडायचं असतं", असं रितेश देशमुख म्हणाले. "तुमच्या जीभेचा ब्रेक फेल झाला आहे", असं रितेश देशमुख म्हणत असताना तन्वीने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रितेशने तन्वीला "मी बोलतोय ना.. एक मिनिट थांब", असं म्हणत तिला गप्प केलं.
रूचिता घराचा व्हॉईस की नॉईज?
रितेश देशमुखने रूचितालाही झापलं. तिच्याही वागण्यावरही निशाणा साधला. सुरूवातीला रूचिताने बिग बॉसच्या घरात आल्यानंतर स्वत:ची ओळख 'वाघीण' म्हणून करून दिली होती. याचा संदर्भ देत रितेश देशमुख म्हणाले, "महाराष्ट्राला वाटलं होतं की तुम्ही बिग बॉस घराचा व्हॉईस व्हाल. पण सध्या तुम्ही या घराचा फक्त नॉईस आहात", असं रितेश देशमुख म्हणाले.
























