मुहूर्त ठरला! श्रेयस तळपदेची दमदार निर्मिती; स्त्रीशक्तीचं तेजस्वी रूप दाखवणार ‘मर्दिनी', कधी येणार मोठ्या पडद्यावर?
‘प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनीच असते… वेळ आली की ती आपलं खरं रूप दाखवते…’ या आशयाभोवती फिरणारी ‘मर्दिनी’ची कथा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाही.

Marathi Film: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका दमदार आशयाच्या चित्रपटाची सुरुवात झाली आहे. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट नुकताच पार पडला. श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पार पडलेल्या या शुभारंभाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला औपचारिक सुरुवात झाली आहे. स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि शक्तीची प्रभावी कथा मांडणारा ‘मर्दिनी’ (Mardini) हा सिनेमा 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
स्त्रीशक्तीची ताकद उलगडणारी कथा
‘प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनीच असते… वेळ आली की ती आपलं खरं रूप दाखवते…’ या आशयाभोवती फिरणारी ‘मर्दिनी’ची कथा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाही. समाजातील विविध स्तरांतील स्त्रियांच्या संघर्षांची, त्यांच्यातील जिद्दीची आणि संकटांशी दोन हात करण्याच्या क्षमतेची ही गाथा आहे. वास्तववादी मांडणी आणि भावनिक खोली असलेली ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी ठरणार आहे.
दमदार कलाकारांची फळी
या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांसारख्या अनुभवी कलाकारांसह बालकलाकार मायरा वैकुळ हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांचा अभिनयाचा ठसा आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’ अधिक प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे.
नवे दिग्दर्शन, नवा अनुभव
‘मर्दिनी’द्वारे दिग्दर्शक अजय मयेकर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तर दीप्ती तळपदे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सशक्त विषय, प्रभावी मांडणी आणि दर्जेदार सादरीकरण यांचा संगम साधत ‘मर्दिनी’ हा सिनेमा 2026 मध्ये प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि लक्षात राहणारा सिनेमॅटिक अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.























