(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hrishikesh Shelar on Ashok Saraf : 'त्या' सुप्परस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो अन् बॅकस्टेच्या रांगेतला मी..., हृषिकेश शेलारने शेअर केला अशोक सराफांसोबतचा 'तो' किस्सा
Hrishikesh Shelar on Ashok Saraf : अभिनेता हृषिकेश शेलार याने नुकतीच अशोक सराफ यांच्यासोबत एक फोटो शेअर केलाय. त्यांच्या या पोस्टची चर्चा सध्या सगळीकडे होतेय.
Hrishikesh Shelar on Ashok Saraf : अभिनय क्षेत्रात काम करताना अनेक प्रसंग येत असतात, कलाकार त्यांच्या आयुष्यातील हे प्रसंग वेळोवेळी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर देखील करतात. असाच एक अनुभव अभिनेता हृषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) याने शेअर केलाय. अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या कामाचे अनेकजण चाहते आहेत. तसेच कलाक्षेत्रात अशोकमामांच्या हस्ते सत्कार होणं ही प्रत्येकासाठी तितकीच खास गोष्ट असते. असाच अनुभव अभिनेता हृषिकेश शेलार याने त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केलाय. हृषिकेश सध्या 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikveen Changalach Dhada) या मालिकेत अधिपती ही भूमिका साकारत आहे.
नुकतच हृषिकेशचा अशोक सराफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी काही वर्षांपूर्वी अशोक सराफांसोबतचा एक किस्सा हृषिकेशने शेअर केला. अशोक सराफ यांचं एक नाटक पाहण्यासाठी हृषिकेश गेला होता. तेव्हा त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेला असला तरीही फोटो न काढताच हृषिकेश माघारी आला. आज अशोक सराफांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर हृषिकेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत हृषिकेशचं अभिनंदन देखील केलंय.
'हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतय?'
हृषिकेशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, दहा वर्षांपूर्वी आपल्या जवळच्या एका शहरात आपल्या सगळ्यात लाडक्या नटाचं नाटक आलेलं असतं. आपण आपल्या जिगरी दोस्ताबरोबर आपल्या 'त्या' आवडत्या नटाचे डायलॉग्ज म्हणत म्हणतच दीड-दोन तासाची रपेट करून नाटकाला पोहचतो. पडदा उघडतो आणि 'ते' स्टेज वर येतात, आपण त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतो.. आणि पाहतच राहतो.हाच तो नट ज्यांनं आपलं बालपण सुंदर केलं,आनंदी केलं.. हाच तो नट जो आपल्याला एवढा आपलासा वाटतो,जवळचा वाटतो, की तो आपल्या स्वप्नात येतो. आपण बुचकळ्यात.. हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतय?
'अर्धा तास रांगेत थांबून शेवटी...'
नाटक संपल्यावर बॅक स्टेजला मोठी रांग त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी. आपणही त्या गर्दीत सामील होतो, अर्धा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुप्परस्टार च्या जवळ पोहोचल्यावर अचानक काहीतरी वाटतं आणि आपण फोटो न काढताच बाजूला होतो रांगेतून आणि दोस्ताला कानात म्हणतो "मला 'गर्दी' म्हणून नाही भेटायचं यांना.मी भेटणार नक्की, पण आत्ता असं नाही". बॅक स्टेजला घुटमळत आमच्या भेटीचा तो क्षण आपण लांबणीवर टाकून देतो, अनिश्चित काळासाठी. आपण परत बुचकळ्यात.. हा शहाणपणा की मूर्खपणा?, असं हृषिकेशनं पुढं म्हटलं आहे.
'त्या' सुप्परस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो...
बरोब्बर दहा वर्षांनी, आता स्टेजवर आपल्या 'त्या' सुप्परस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो, ते आपल्या कामाचं कौतुक करत असतात आणि त्यांचे शब्द स्लोमोमध्ये आपल्या कानावर हळुवार मोरपिसासारखे..! अगदी तसंच जसं आपण अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिलंय. आपला आपल्या कानांवर-डोळ्यांवर विश्वास बसत नाही आपण थेट त्यांचे पाय धरतो, स्लोमो मध्येच. बॅकस्टेच्या रांगेतला मी, स्टेजवरच्या माझ्याकडे पाहून हसतो; आणि आपण परत एकदा कंटिन्युटी मध्ये बुचकळ्यात..हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतय?, असा अनुभव हृषिकेशने यावेळी शेअर केलाय.