(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुशांत सिंह आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडनं घेत होता, हे कसं सिद्ध करणार?, हायकोर्टाचा सवाल
सुशांतनं माझा आणि माझ्या भावाचा केवळ स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतला, जसा तो त्याची नशेची सवय पूर्ण करण्यासाठी इतरांचा करायचा, असा थेट आरोप रियानं केला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टानं राखून ठेवला. लवकरात लवकर यावर निकाल जाहीर करू असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. दरम्यान सुशांत सिंह आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडनं घेत होता, हे कसं सिद्ध करणार?, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. एनसीबीनं या सर्व जामीन अर्जांना जोरदार विरोध केला. एनडीपीएस कायद्याअंतर्गत ड्रग्जच्या व्यापाराचे आरोप असणा-यांकडनं मुद्देमाल हस्तगत करण्याची गरजचं नाही. असं स्पष्ट करत साल 1985 मध्ये या कायद्याची निर्मिती याचसाठी करण्यात आली आहे. कारण ड्रग्जचं सेवन करणा-यापेक्षा ते मिळवण्यासाठी मदत करणारा, पैसे देणारा, प्रवृत्त किंवा प्रोत्साहन देणारा कायद्यानं जास्त मोठा गुन्हेगार आहे. असं एनसीबीच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांनी स्पष्ट केलं.
एनसीबीसाठी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू केवळ इतकीच या केसची व्याप्ती नाही. सुशांतनं या ड्रग्ज रॅकेटमधनं अंमलीपदार्थ घेतले की नाही घेतले यापुरता हा तपास मर्यादीत नाही. यानिमित्तानं समाजात पसरलेलं हे ड्रग्जचं जाळ नष्ट करणं हा मुळ उद्देश आहे. एखादी व्यक्ती ड्रग्ज घेत असल्यास त्याची माहिती दडवण हेदेखील त्याला मदत करून उद्युक्त केल्यासारखंच आहे, असा दावा एनसीबीच्यावतीनं रिया चक्रवर्तीच्या जामीनाला विरोध करताना करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयानं रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंतसह ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांना जामीन नाकारत 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान रिया चक्रवर्तीनं जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सुशांतवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतनं माझा आणि माझ्या भावाचा केवळ स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतला, जसा तो त्याची नशेची सवय पूर्ण करण्यासाठी इतरांचा करायचा. असा थेट आरोप रियानं केला आहे. तसेच एनसीबीनं ड्रग्जच्या व्यवसाय केल्याबद्दल लावलेलं कलम 27(a) आणि 37 लावल्यालाही आव्हान दिलं आहे.
रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यावर ड्रग्जचा व्यवसाय केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच इतरांचा या संपूर्ण प्रकरणात सक्रिय सहभाग आहे, हे सारेजण एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना जामीन दिल्यास तपासावर त्याचा थेट परिणाम होईल. त्यामुळे या कलमांअंतर्गत कोर्टानं त्यांना जामीन देऊ नये असा दावा एनसीबीच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयत केला होता. 11 सप्टेंबर रोजी या सर्वांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे.
आपण निर्दोष असून आपण कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वी पासूनच सुशांत ड्रग्ज घेत होता हे आता सिद्ध झालं आहे. त्याच्या आयुष्यात असलेल्या काही बॉलिवूड अभिनेत्रींनी तपासयंत्रणेला तशी कबूलीच दिली आहे. यात आपल्याला गुंतवण्यात आले असून तपासयंत्रणेकडून गुन्हा कबूल करण्यास भाग पाडण्यात आल्याचंही या याचिकेतून नमूद करण्यात आलं होतं. रियाने ड्रग्सचे सेवन केले असले तरीही तिने ड्रग्ज रॅकेटला आर्थिक मदत केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ड्रग्ज सेवन हा जामीन पात्र गुन्हा आहे. असा दावा रियाच्या याचिकेतून करण्यात आला आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून रियाला लैंगिक अत्याचाराच्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे तिला जर कोठडी मिळाली तर तिच्या जीवाला धोका संभवू शकतो असं या याचिकेतून म्हटले आहे. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन, सुरक्षितता आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता रियाला जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे.