Happy Birthday Pallavi Joshi : बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, आता मोठा पडदा गाजवतेय पल्लवी जोशी!
Pallavi Joshi Birthday : पल्लवी जोशीने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आपल्या मेहनतीने आणि कामाची आवड यामुळेच ती आज या स्थानावर आहे.
Pallavi Joshi Birthday : अभिनेत्री पल्लवी जोशीला (Pallavi Joshi) आजघडीला कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती एक भारतीय अभिनेत्री तसेच मॉडेल आणि चित्रपट निर्माती आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीचा जन्म 4 एप्रिल 1969 रोजी मुंबईत झाला. आज ही अभिनेत्री तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात पल्लवी जोशीने ‘राधिका मेनन’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने नकारात्मक भूमिका साकारली आहे. प्रेक्षक तिच्या व्यक्तिरेखेचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
या चित्रपटातून तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी लहानपणापासूनच तिने मनोरंजनविश्वात काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आपल्या मेहनतीने आणि कामाची आवड यामुळेच ती आज या स्थानावर आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट, तसेच टेलिव्हिजन मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'वो छोकरी' या चित्रपटातून तिने मनोरंजन विश्वात पहिले पाऊल ठेवले. पल्लवीने 'सा रे ग मा पा' लिटिल चॅम्प्स हा टेलिव्हिजन रिअॅलिटी शो देखील होस्ट केला आहे.
‘अशी’ झाली विवेक अग्निहोत्रींशी भेट!
पल्लवी जोशी चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांना एका रॉक कॉन्सर्टमध्ये भेटली जिथून, त्यांची प्रेमकथा सुरू झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना तीन वर्षे डेट केले. 28 जून 1997 रोजी त्यांनी एकमेकांसोबत लग्नाचे सात फेरे घेतले. पल्लवी जोशीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये 'पनाह', 'दाता', 'तहलका', 'झूठी शान', 'सूरज का सातवा घोडा', 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
हिंदीशिवाय पल्लवी जोशी मराठी चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. पण, चित्रपट असो किंवा टीव्ही मालिका, ती निवडक प्रोजेक्टमध्येच काम करते. तिच्या अभिनयामुळे ती प्रेक्षकांची मने जिंकते आणि नंतर काही काळ या विश्वापासून लांब राहून, नव्या प्रोजेक्टची तयारी करते.
बालकलाकार म्हणून सुरुवात!
पल्लवीने हिंदीशिवाय गुजराती आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘आदमी सडक का’, ‘डाकू और महात्मा’, हेमा मालिनीची ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटांमध्ये ती बाल कलाकार म्हणून दिसली. या चित्रपटांमध्ये लहानग्या पल्लवीचा निरागसपणा सगळ्यांची मनं जिंकायचा.
पल्लवीने अनेक उत्तम टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. त्यापैकी सर्वात संस्मरणीय म्हणजे 1998 मध्ये प्रसारित झालेली ‘अल्पविराम’ ही मालिका. या मालिकेत पल्लवी ‘अमृता बजाज’च्या भूमिकेत दिसली होती. ‘मिस्टर योगी’, ‘भारत एक खोज’, ‘जूस्तजू’, ‘मृगनयनी’, ‘तलाश’, ‘इम्तिहान’, ‘ग्रहण’ यांसारख्या मालिकांमध्ये पल्लवीने जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवले आहे.
हेही वाचा :
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार
- Grammy 2022 : संगीतकार रिकी केजने जागवल्या भारतीयांच्या आशा, 'डिव्हाईन टाइड्स'साठी मिळालं नामांकन!
- Prithviraj : मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो केला शेअर, राजकुमारी संयोगिताचा रॉयल लूक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha