मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ, हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?
तिघे जण एका बाईकवरून जात असताना रस्त्यात अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांना चुकवण्यासाठी त्यांनी थोडा वळसा घेतला. त्याच वेळी काळ्या किआ कारने बाईकला जोरदार धडक दिली.

Bengaluru: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या सुरेश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी एका हिट-अँड-रन प्रकरणामुळे. बंगळुरूच्या बायतरयनपुरा परिसरात 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तिच्या कारने बाईकला धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात अनिता नावाची महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाले आहे. इतर दोन प्रवासी, अनुषा आणि किरण, हे किरकोळ जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर दिव्या सुरेशने कार न थांबवता तेथून पळ काढल्याने हा प्रकार हिट-अँड-रन प्रकार असल्याचं समोर आलं आहे.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, तिघे जण एका बाईकवरून जात असताना रस्त्यात अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांना चुकवण्यासाठी त्यांनी थोडा वळसा घेतला. त्याच वेळी दिव्या चालवत असलेल्या काळ्या किआ कारने बाईकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी आणि नातेवाईकांनी त्या कारचा क्रमांक नोंदवून पोलिसांना माहिती दिली.
जखमी अनितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर बीजीएस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा खर्च आला आहे. अनिताच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, तिला आता काही महिन्यांसाठी अंथरुणाला खिळून राहावं लागणार आहे. या घटनेबाबत 7 ऑक्टोबर रोजी किरणने पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. तपासादरम्यान कार चालवणारी व्यक्ती दिव्या सुरेश असल्याचं आणि अपघातानंतर दिव्याने पीडितांशी संपर्क साधलेला नाही किंवा कोणतीही मदत केलेली नाही, असा गंभीर आरोप जखमींच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, दोन्ही बाजूंनी तक्रार नोंदवण्यासाठी काहीसा उशीर झाल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना अपघातग्रस्त कार दिव्या सुरेश हिच्याच ताब्यात होती हे स्पष्ट झाले असून, या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत असे संकेत मिळाले आहेत की, मोटरसायकलवर तिघे जण बसले होते आणि वेगामुळे अपघात घडला असावा. मात्र, या धडकेचं नेमकं कारण अजूनही पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालेलं नाही.
























