Chhaya Kadam : 'तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहचलीये...', कान्समधील कौतुक सोहळ्यानंतर छाया कदम यांनी मानले प्रेक्षकांचे आभार
Chhaya Kadam : छाया कदम यांनी कान्समध्ये त्यांच्या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारानंतर एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Chhaya Kadam : मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्यामुळे सध्या मराठी प्रेक्षक आणि मराठी सिनेसृष्टीचा उर अभिमानाने भरुन आलाय. कारण या मराठी अभिनेत्रीचा कान्सच्या सोहळ्यात कौतुक सोहळा पार पडला. पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या सिनेमाचं कान्स सोहळ्यात विशेष स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशनही दिलं. सध्या याचमुळे छाया कदम यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांची ही भूमिकाही नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांच्या कान्समधील कौतुक सोहळ्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मराठी प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत. या सोहळ्यात त्यांच्या ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या सिनेमाला पुरस्कार देखील मिळाला. त्यानिमित्ताने ती पोस्ट शेअर केली आहे.
छाया कदम यांची पोस्ट नेमकी काय?
छाया कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यावर अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्रीने म्हटलं की, आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाटेला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टीवल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची - लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्र्वासामुळेच, एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथ पर्यंत येऊन पोहचला आहे.माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. की तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहचली आहे. खूप समाधान - आनंद आणि मन भरून आले.
छाया कदम यांचे सिनेमे
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे चित्रपटही विशेष गाजले.
View this post on Instagram