World Theatre Day 2023: 10 रुपयाचे पॉपकॉर्न थिएटरमध्ये 200 ते 500 रुपयाला का विकतात? जाणून घ्या त्यामागचं कारण
World Theatre Day 2023: चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ बाहेरून आणण्यास बंदी घालण्यास थिएटर मालक मोकळे आहेत, असं न्यायालयानं या आधीच स्पष्ट केलं आहे.
मुंबई : राज्यातील थिएटरमध्ये महाग किमतीत मिळणाऱ्या पॉपकॉर्नवरुन मनसेने आंदोलन केलं होतं. गेल्या जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या भेटीतअभिनेता जॅकी श्रॉफ यांनी सिनेमागृहात उपलब्ध पॉपकॉर्नची किंमत कमी करण्याचे आवाहन केले होते. बाहेर 10 रुपयात मिळणारे पॉपकॉर्न थिएटरमध्ये 200 ते 500 रुपयांना विकले जातात. कधीकधी पॉपकॉर्नची किंमत चित्रपटाच्या तिकिटापेक्षा दुप्पट होते. अशा स्थितीत हा प्रश्न नेहमी मनात राहतो की पॉपकॉर्न इतकं महाग का विकलं जातंय आणि त्यावर काही कायदेशीर बंधन आहे की नाही?
जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने सिनेमागृहांच्या मालकांना त्यांच्या इच्छेनुसार अटी व शर्ती ठेवण्यास मोकळे असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास बंदी घालण्यास हॉल मालक मोकळे आहेत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. म्हणजे थिएटर मालकांना त्यांच्या इच्छेनुसार हॉलच्या आत खाण्यापिण्याची किंमत ठरवता येईल. मात्र त्यानंतरही पॉपकॉर्नचे भाव दहा पटीने कसे वाढले? याची अनेक कारणे आहेत.
वास्तविक, थिएटरमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांचा दुसरा कोणीही स्पर्धक नाही. अशा स्थितीत एकदा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाच्या आवारात प्रवेश केला की, प्रेक्षकांना थिएटर स्टॉलशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशा स्थितीत त्याला काही खायचं असेल तर कितीही खर्च आला तरी तिथूनच खावं लागतं.
एखादा चित्रपट चालला नाही तर त्याचा फटका थिएटर मालकांना बसतो. त्यामुळे या चित्रपटाची तिकिटं मग तोटा सहन करुन कमी किमतीत विकावी लागतात. त्यांना बॉक्स ऑफिसमधून मिळणाऱ्या नफ्यातील मोठा हिस्सा वितरकांना द्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी महसूल मिळवण्यासाठी खाद्य आणि पेय पदार्थांची विक्री हे उत्पन्नाचे उत्तम साधन आहे.
मात्र चित्रपटगृहात जाणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ घेऊन जाणं बंधनकारक नाही. हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. अनेक वेळा थिएटर मालक तिकिटाची किंमत कमी करतात, जेणेकरून लोक मोठ्या संख्येने तिथे पोहोचतात आणि नंतर त्यांना इतर वस्तूंद्वारे (खाद्य) कमाई करता येते.
थिएटर मालक यात व्यवसाय शोधत असले तरी सामान्यांना मात्र त्याचा भूर्दंड बसताना दिसतोय. थिएटरमध्ये बाहेरुन खाद्यपदार्थ आणायला परवानगी नाही. त्यामुळे राज्यात मनसेच्या वतीनं आंदोलनही करण्यात आलं आहे. मात्र तेवढ्यापुरतं हा नियम शिथिल करण्यात आला. नंतर मात्र 'ये रे माझ्या मागल्या' प्रमाणे पॉपकॉर्नचे दर वाढवण्यात आले.
ही बातमी वाचा: