(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonali Phogat Case : ‘मी खूप अस्वस्थ झालेय’, सोनाली फोगाट यांनी दिग्दर्शकाला कॉल करून सांगितली होती आपली व्यथा!
Sonali Phogat Case : भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत.
Sonali Phogat Case : भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता सोनाली फोगाट हत्याकांडप्रकरणी (Sonali Phogat Murder Case) यूपीच्या चित्रपट दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला आहे. सीतापूरमध्ये राहणारे दिग्दर्शक मोहम्मद अक्रम म्हणाले की, सोनाली यांच्या मृत्यूच्या 20 दिवस आधी त्यांचे सोनालीशी बोलणे झाले होते. यावेळी त्या खूप अस्वस्थ वाटत होत्या. सोनाली यांनी मोहम्मद अक्रमना सांगितले होते की, मी खूप अस्वस्थ आहे. एवढेच नाही तर, कराराचे पैसे सुधीरला देऊ नका अन्यथा ते पैसे माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या होत्या.
मोहम्मद अक्रम यांनी सांगितले की, सोनाली फोगाट यांचा एक कार्यक्रम होता, पण सुधीरमुळे त्या कार्यक्रमाच्या करारावर त्यांची सही होऊ शकली नाही. सुधीर बहुधा सोनाली यांना ब्लॅकमेल करत होता. मोहम्मद अक्रम यांच्या म्हणण्यानुसार, सोनाली फोगाट यांच्याशी संबंधित सर्व निर्णय त्यांचा पीए सुधीर सांगवान घेत होता.
त्याच्यावर आधीपासूनच संशय होता!
अक्रम म्हणाले की, 'फोनवर बोलत असतानाच त्या सुधीरपासून थोड्या दूर गेल्या आणि मला म्हणाल्या की, आजच्या नंतर तू सुधीरच्या नंबरवर कधीही फोन करू नकोस. त्याच्याशी कोणत्याही डीलबद्दल बोलू नकोस. आपण समोरासमोर बोलू. सध्या मी खूप अस्वस्थ आहे. सुधीर नसेल तेव्हा आपण समोरासमोर याविषयावर बोलू.’ मागील आठ महिन्यांपासून अक्रम सोनाली यांच्या संपर्कात होते. सुधीरच्या वागणुकीविषयी सांगताना ते म्हणाले की, ‘सोनालीच्या मृत्यूच्या दिवशी जेव्हा मी सुधीरशी बोललो, तेव्हा त्याने सांगितले की सोनाली यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मला त्याच दिवशी सुधीरवर संशय आला होता. तो ढोंग करतोय असं वाटतं होतं.
सीबीआय चौकशीची मागणी करणार!
सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे नातेवाईक विकास सिंघमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, त्यांनी सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीश यूयू ललित यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, 'गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नाहीये. त्यामागे राजकीय दबाव हे कारण असू शकतो, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आता आम्ही गोवा उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत.’
सुधीरने दिली कट रचल्याची कबुली
सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान याला अटक करण्यात आली आहे. सुधीरने पोलिसांना कबुली जबाब दिला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो सोनाली यांना पार्टीच्या बहाण्याने कर्लीज हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने सोनाली यांना जबरदस्तीने पाण्यात अंमली पदार्थ मिसळून प्यायला लावले. सुखविंदरने त्याला ड्रग्ज घेण्यात मदत केल्याचेही सुधीरने आपल्या कबुलीजबाबात सांगितले. त्यानंतर सुखविंदरनेही ही गोष्ट कबुल केली. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, सोनालीच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता, याची कबुली देखील त्याने दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: