Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Buldhana Crime: बुलढाण्यात नवऱ्याने बायकोला सुपारी देऊन संपवलं. पतीनेच दिली आपल्या शिक्षक पत्नीची हत्या करण्याची सुपारी. पतीसह तिघे अटकेत, तीन दिवसांची पोलीस कोठडी.

Buldhana Crime News: एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात (Buldhana News) घडली आहे. अपघाताचा बनाव करत व सुपारी किलरला एक लाखाची सुपारी देत आपल्या पत्नीची हत्या (Murder news) केल्याची ची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात घडली आहे. 2 मार्च रोजी वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेवर (ZP School) शिक्षिका असलेल्या पिंपळगाव काळे येथे ड्युटीवर जात असताना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांच्या स्कुटीला अज्ञात वाहन चालकाने धडक दिली होती. यामध्ये वृषाली गावंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. (Maharashtra Crime news)
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक याठिकाणी पोहोचले तेव्हा वृषाली गावंडे यांच्या मृतदेहाशेजारी बसून त्यांचे पती प्रकाश गावंडे रडत बसले होते. त्यावेळी पोलिसांनाही हा अपघातच वाटला होता. मात्र, नंतर थोडी चौकशी केली असता वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना घातपाताची शंका बोलून दाखवली होती. तेव्हा जळगाव जामोद पोलिसांनी या सगळ्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ घातपाताच्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्याआधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले.
मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा पती असलेला प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर (रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर) या दोघांनी आपल्याला एक लाख रुपये सुपारी देऊन वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चहूळकर या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश जवळकर या दोघांनी टाटा पिकप चालक असलेला मंगेश सूर्यवंशी याला एक लाख रुपये देऊन स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवून आणण्यास सांगितले. 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास शिक्षिका वृषाली गावंडे या शाळेवर आपल्या दुचाकीने जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठळ दरम्यान वृषालीच्या दुचाकीला धडक मारून तिला जागीच ठार केलं. जळगाव - जामोद पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास करून काही तासातच तीनही आरोपींना गजाआड केलं व न्यायालयासमोर हजर केलं असता काल तिन्ही आरोपीना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा प्रकारची आपल्याच पत्नीची हत्या घडवून आणणाऱ्या पतीला जेरबंद केल्याने जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा





















