एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रेक्षकांशी 'नाळ' जुळली, पहिल्या आठवड्यातील कमाई...
'नाळ'ने पहिल्या आठवड्यात तब्बल 14 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती 'झी स्टुडिओ'ने दिली आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
मुंबई : मराठी सिनेविश्वाला सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. सुबोध भावेंची मुख्य भूमिका असलेल्या '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटापाठोपाठ आणखी एका मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं अभिनयातील पदार्पण असलेल्या 'नाळ' चित्रपटाची प्रेक्षकांशीही नाळ जुळल्याचं दिसून येत आहे.
'नाळ'ने पहिल्या आठवड्यात तब्बल 14 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती 'झी स्टुडिओ'ने दिली आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे यामध्ये मायलेकाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच अनेक जण गोजिऱ्या 'चैत्या'च्या प्रेमात आहेत. चिमुरड्या चैत्याच्या भावविश्वातून उलगडणाऱ्या या चित्रपटावर सिनेरसिकांच्या उड्या पडत आहेत.
'नाळ' हा झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांच्या 'आटपाट' संस्थेची निर्मिती आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी छायाचित्रण-दिग्दर्शनासोबत नाळ सिनेमाच्या कथा-पटकथेची जबाबदारी उचलली आहे. तर संवाद नागराज मंजुळेंच्या लेखणीतून उतरले आहेत. पिस्तुल्या, फँड्री, सैराटनंतर नागराजची कमाल पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
काशिनाथ घाणेकरचं तगडं आव्हान
'नाळ' हा सिनेमा 300 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत होता. या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला, त्याचवेळी 'नाळ' रिलीज झाला.
झी आणि व्हायकॉम 18 या प्रतिस्पर्ध्यांचे चित्रपट असूनही तिकीटबारीवर मात्र निकोप स्पर्धा दिसून आली. चाहत्यांनी दोन्ही सिनेमांवर समसमान भरभरुन प्रेम केलं आहे. याशिवाय गॅटमॅट, के के मेनन यांचं मराठीतील पदार्पण असलेला 'एक सांगायचंय...' अशा काही मराठी चित्रपटांचं आव्हानही बॉक्स ऑफिसवर होतं.
ठग्जला दणका
बॉलिवूडच्या सिनेमांमुळे दर्जेदार मराठी सिनेमांची गळचेपी होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अशाच प्रकारची गळचेपी '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाची पहिल्या आठवड्यात झाली होती. अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'मुळे चित्रपटगृहांनी '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' बाजूला सारलं होतं.
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ला सुरुवातीला मुंबईत हजारहून अधिक स्क्रीन्स मिळाल्या होत्या. तर '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाला 177 स्क्रिन्स मिळाल्या होत्या. मात्र दुसऱ्या आठवड्याची परिस्थिती उलट झाली. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या स्क्रिन्सची संख्या दीडशेवर गेली. तर '... आणि डॉ काशिनाथ घाणेकर' सिनेमाच्या स्क्रीन वाढून 300 वर पोहचल्या होत्या.
नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिकेत घेऊन 'झुंड' चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. यापूर्वी त्यांच्या सर्वच चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
'नाळ' सिनेमातील माय-लेकाच्या जोडीशी गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement