Vinod Thomas: प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 45 व्या वर्षी निधन; कारमध्ये आढळला मृतदेह
Vinod Thomas: अभिनेते विनोद थॉमस (Vinod Tomas) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Vinod Thomas: चित्रपट क्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस (Vinod Tomas) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोट्टायम (Kottayam) येथील पंपाडीजवळ (Pampady) विनोद यांचा मृतदेह आढळला. विनोद थॉमस यांचा मृतदेह एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळून आला. पोलिसांनी विनोद थॉमस यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. विनोद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
कारमध्ये आढळला मृतदेह
विनोद थॉमस यांचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हॉटेल व्यवस्थापनाला त्यांच्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बराच वेळ बसलेली आढळली. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली.याबाबत माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ हॉटेलच्या पार्किंगमध्ये हजर झाले. पोलिसांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोहोचून विनोद थॉमस यांना कारमधून बाहेर काढले. यानंतर पोलिसांनी विनोद यांना जवळच्या रुग्णालयात नेले. नंतर विनोद थॉमस यांना मृत घोषित करण्यात आले. विनोद थॉमस यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, 'आम्ही विनोद यांना जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यासोबतच विनोद थॉमस यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
विनोद थॉमस यांचे चित्रपट
विनोद थॉमस हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. विनोद यांनी 'अयप्पनम कोश्युम', 'नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला', 'ओरू मुराई वंथ पथया', 'हॅपी वेडिंग' आणि 'जून' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. विनोद थॉमस यांचा भगवान दसंते रामराज्यम हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: