(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayeshbhai Jordaar Box Office : जयेशभाई जोरदार! पहिल्या विकेंडला बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला
Jayeshbhai Jordaar : रणवीर सिंहचा 'जयेशभाई जोरदार' बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेला नाही.
Jayeshbhai Jordaar Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar) हा सिनेमा 13 मे ला शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कुठेतरी कमी पडला आहे. विकेंडलादेखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली नाही.
12 कोटींची केली कमाई
'जयेशभाई जोरदार' या सिनेमाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 4.75 कोटींची कमाई केली आहे. त्याआधी शुक्रवारी या सिनेमाने 3.25 कोटींची कमाई केली होती. तर शनिवारी चार कोटींचा गल्ला जमवला होता. अशाप्रकारे आतापर्यंत सिनेमाने फक्त 12 कोटींची कमाई केली आहे.
गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सिनेमे फ्लॉप
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून अनेक सिने-निर्माते त्यांचे सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित करत आहेत. कोरोनानंतर 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा वगळता '83', 'सूर्यवंशी', 'जर्सी', 'रनवे 34' आणि 'हीरोपंती 2' हे सिनेमे मात्र फ्लॉप झाले आहेत. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमांना प्रेक्षक पसंती दर्शवताना दिसत आहेत. 'पुष्पा', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या दाक्षिणात्य सिनेमांनी मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
View this post on Instagram
'जयेशभाई जोरदार' या सिनेमाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्करने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दिव्यांग बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'जयेशभाई जोरदार' या सिनेमात रणवीर सिंहने गावच्या सरपंचाची भूमिका साकारली आहे. तर बोमन ईरानी यांनी रणवीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेशभाईच्या पत्नीची भूमिका या सिनेमात साकारली आहे. तसेच रत्ना पाठक आणि दीक्षा जोशी हे कलाकार देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
रणवीर सिंहची हटके भूमिका
'जयेशभाई जोरदार' या सिनेमात रणवीर सिंह एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहेत, जो आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी कठोर संघर्ष करतो आणि बाळाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. रणवीर सिंहच्या या व्यक्तिरेखेचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. मनीष शर्मा निर्मित, 'जयेशभाई जोरदार' मध्ये 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे देखील आहे. शालिनी या सिनेमाच्या माध्यमातून रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.