Guru Dutt Birth Anniversary : टेलिफोन ऑपरेटर ते बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता, ‘असा’ होता गुरु दत्त यांचा फिल्मी प्रवास
Guru Dutt : बॉलिवूडचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अर्थात अभिनेते गुरु दत्त (Guru Dutt) यांनी केवळ अभिनेताच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य केलं.
Guru Dutt Birth Anniversary : बॉलिवूडचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अर्थात अभिनेते गुरु दत्त (Guru Dutt) यांनी केवळ अभिनेताच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य केलं. 50-60चं दशक त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवलं. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहेब बीबी और गुलाम’ आणि ‘चौदवीं का चांद' अशा सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. गुरु दत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 रोजी कर्नाटकमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव वसंतकुमार शिवशंकर पदुकोण असे होते.
मनोरंजन विश्वात येण्यापूर्वीपासून गुरु दत्त यांचा संघर्ष सुरु होता. गुरू दत्त यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. चित्रपटात काम करण्यापूर्वी ते कोलकातामध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत होते. मात्र, त्यांना मनोरंजन विश्व खुणावत होतं. या कामात त्यांचे मन लागत नसल्याने त्यांनी हे काम सोडले. यानंतर त्यांनी पुण्यातील एका फिल्म कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. या नोकरीसाठी त्यांना तीन वर्षांचा करार करावा लागला होता. मात्र, इथेच त्यांची भेट अभिनेते देवा आनंद यांच्याशी झाली होती. या भेटीचं रुपांतर घनिष्ठ मैत्रीत झालं.
चित्रपटाच्या सेटवर प्रेम गवसलं!
1944मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चांद’ या चित्रपटातून त्यांना पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी कोरिओग्राफर आणि सहायक दिग्दर्शक म्हणून काम सुरु ठेवले. 1951मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजी’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून यशस्वी पदार्पण केले.
‘बाजी’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट प्रसिद्ध गायिका गीता रॉय यांच्याशी झाली. पाहताचक्षणी गुरु दत्त त्यांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेमाचं नातं फुलू लागलं. 1953मध्ये त्यांनी गीता यांच्याशी लग्न केले.
चाहत्यांच्या हृदयावर केलं राज्य!
'कागज के फूल', 'प्यासा', 'साहिब बीबी और गुलाम', 'चौदहवीं का चांद', 'आर-पार' आणि 'सीआईडी' यांसारख्या चित्रपटांमधून गुरु दत्त प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहिले. ‘सांझ और सवेरा’ हा गुरु दत्त यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 10 ऑक्टोबर 1964 रोजी या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने या जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या