(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Naam Ghyav Vitthal : 'नाम घ्यावं विठ्ठल' या गाण्याद्वारे विठुरायाला भावनिक साद, वारीनिमित्ताने श्रीजीत गायकवाडकडून सांगितीक भेट!
Naam Ghyav Vitthal : डोळ्यांचं पारणं फिटवणारा वारीचा हा रम्य सोहळा संगीतकार व गायक श्रीजीत गायकवाड 'नाम घ्यावं विठ्ठल' (Naam Ghyav Vitthal) या गाण्यामार्फत मांडणार आहे.
Naam Ghyav Vitthal : दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला पायी वारी करत निघाले आहेत. डोळ्यांचं पारणं फिटवणारा हा रम्य सोहळा संगीतकार व गायक श्रीजीत गायकवाड 'नाम घ्यावं विठ्ठल' (Naam Ghyav Vitthal) या गाण्यामार्फत मांडणार आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधत हे गाणं त्याने नुकतचं प्रदर्शित केलं आहे. शिवाय हे गाणं त्याने स्वत: गायले असून, संगीतसुद्धा त्यानेच केले आहे. या गाण्याला गणपत कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केले असून, गाण्याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार, गायक श्रीजीत गायकवाड 'नाम घ्यावं विठ्ठल' या गाण्याविषयी बोलताना सांगतो की, ‘याआधी मी 'क्यूट' आणि 'छंद लागला' ही रोमॅंटिक गाणी केली होती. ती गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. परंतु यावेळेस थोडं आऊट ऑफ द बॉक्स जाऊन भक्तीगीत करण्याचा प्रयत्न मी केला आहे. गाण्याचे बोल गणपत सरांनी खूप सुंदर लिहीले आहेत. त्यामुळे मी या गाण्याला संगीत देताना संपूर्ण वारीचं नयनरम्य चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहीलं.’
विठुरायाचे असंच प्रेम मिळो!
याविषयी बोलताना पुढे तो सांगतो की, ‘मला शालेय जीवनापासून संगीताची आवड होती. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेणं हे त्यावेळेस आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नव्हतं. अनंत अडचणी असतानाही, माझ्या आईने मला प्रोत्साहन दिलं आणि काही काळासाठी मी शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेतले. त्यानंतर मी युट्यूब आणि इंटरनेटचं माध्यम स्विकारलं. त्यातून प्रयत्न करत होतो. पण शास्त्रीय संगीताची गरज भासतच होती. कला क्षेत्रातील काही मित्रांनी मला मार्गदर्शन केलं. तेव्हा फक्त गायकी न अवलंबता संगीत दिग्दर्शन हा पर्याय डोळ्यासमोर ठेवत प्रयत्नांना सुरूवात केली. काही वेळा प्रयत्न फसले. पण, मी हार न मानता प्रयत्न करत गेलो. इंटरनेटच्या सहाय्याने जितका अभ्यास करता येईल, तितका संगीताचा अभ्यास केला. आणि आत्ताही माझा सांगीतिक प्रवास अव्याहत सुरू आहे. माझी आई आणि माझ्या विठुरायाला मी हे गाणं अर्पण करतो. या गाण्याला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून मन भरून आलं. तुम्हा प्रेक्षकांचे आणि आपल्या विठुरायाचे असंच प्रेम मिळो हीच सदिच्छा.’
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या