एक्स्प्लोर
डेथ ऑफ अ जंटलमन... क्रिकेटच्या मैदानाबाहेरची खळबळजनक कहाणी

मुंबई : क्रिकेटविषयी आजवर खूप काही लिहिलं गेलंय, मैदानातल्या नाट्यावर फिल्म्सही बनतायत. पण डेथ ऑफ अ जंटलमन ही डॉक्युमेंटरी मैदानाबाहेरच्या, पडद्याआडच्या घडामोडींचा वेध घेते. क्रिकेटवर प्रेम करणारे दोन पत्रकार म्हणजे इंग्लंडचा सॅम कॉलिन्स आणि ऑस्ट्रेलियाचा जेरॉड किंबर पाच वर्षांपूर्वी एका शोधात निघाले. ट्वेन्टी20च्या जमान्यात टेस्ट क्रिकेटचं काय होणार या अस्सल आणि अट्टल क्रिकेट चाहत्यांच्या मनातला प्रश्नाचं उत्तर सॅम आणि जेरॉडला शोधायचं होतं. त्यासाठीच त्यांनी आजी-माजी क्रिकेटर्स, प्रशासक, सामान्य चाहते आणि पत्रकारांना बोलतं केलं. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर एड कॉवनच्या कसोटी पदार्पणापासून फिल्मची कहाणी सुरू होते. कसोटी क्रिकेटविषयी आजही अनेकांना जिव्हाळा का आहे आणि क्रिकेटला जंटलमन्स गेम का म्हटलं जातं, हे फिल्मच्या सुरूवातीलाच अधोरेखीत होतं. संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनी एका आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयी बोलताना हे क्रिकेट नाही, असा वाक्प्रचार वापरला होता. क्रिकेटमध्ये कुठल्या फसवेगिरीला स्थान नसतं, म्हणूनच कोफी अन्नान यांना तो वाक्प्रचार वापरावासा वाटला. डेथ ऑफ अ जंटलमनमध्ये मायकल होल्डिंग त्याचीच आठवण करून देतात. पण याच फिल्ममधूनं क्रिकेटच्या अर्थकारणाचं एक वेगळंच वास्तव समोर येतं. केवळ पैशाचा विचार करणारे प्रशासक, खेळाशी निगडीत व्यक्तींचे आर्थिक हितसंबंध, बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड या बिग थ्रींच्या हाती गेलेल्या क्रिकेटच्या आर्थिक नाड्या, एन श्रीनिवासन यांच्या काळात घेतले गेलेले निर्णय, आयसीसीमधले सत्तासंघर्ष आणि त्यात मागे पडणारे इतर देशांचे क्रिकेट बोर्डस... गेल्या पाच वर्षांत, विशेषतः आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर तर क्रिकेट आणखीनंच ढवळून निघालंय. क्रिकेट टिकून राहावं यासाठी पैशाची गरज आहे, की पैशाची गरज आहे म्हणून क्रिकेट टिकून आहे, असा नेमका प्रश्न या फिल्ममध्ये पत्रकार गिडॉन हेगनं विचारलायय. इतर खेळ जिथं नवनव्या देशात रुजण्याचा प्रयत्न करतायत, तिथं क्रिकेटच्या काही प्रशासकांची भूमिका संकुचित आणि खेळासाठी घातक वाटू लागलीय. डिसेंबर 2011 ते 2014 या कालावधीत तयार करण्यात आलेली ही फिल्म गेल्या वर्षी लंडनमध्ये रिलीज झाली आणि आता भारतात www.TVFPlay.com वर उपलब्ध झालीय. सॅम आणि जेरॉडनं फिल्म तयार केली, त्यालाही दोन वर्ष झाली. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. क्रिकेटमध्ये पुन्हा बदलाचे वारे वाहतायत. आयसीसीचे विद्यमान चेअरमन शशांक मनोहर यांनी क्रिकेटच्या प्रशासनातली भारत-ऑस्ट्रेलिया-इंग्लंडची मक्तेदारी आपल्याला मंजूर नसल्याचं स्पष्ट केलंय. पण क्रिकेटच्या भल्यासाठी केवळ व्यक्ती बदलून चालणार नाही, तर प्रशासकांच्या आणि चाहत्यांच्या विचारसरणीतही बदल गरजेचाय. जंटलमन्स गेम टिकवायचा असेल तर कसोटी क्रिकेट जगलं पाहिजे, सर्वसामावेशक बनलं पाहिजे, हेच डेथ ऑफ अ जंटलमन पाहिल्यावर जाणवत राहतं. पाहा ट्रेलर :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र























