Dharmaveer : ब्लॉकबस्टर 'धर्मवीर'! दहा दिवसांत केली 18.03 कोटींची कमाई
Dharmaveer : 'धर्मवीर' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.
Dharmaveer : महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) चित्रपटाचाच बोलबाला आहे. 13 मे रोजी हा सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले आहेत. आता या सिनेमाने दहा दिवसांत 18.03 कोटींची कमाई केली आहे.
पहिल्याच आठवड्यात केली 13.87 कोटींची कमाई
'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या सिनेमासह हिंदीतील बिग बजेट सिनेमेदेखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. परंतु धर्मवीर पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अगदी पहिल्याच दिवसापासून धर्मवीरची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. 'धर्मवीर'ने पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींची कमाई केली आहे. केवळ ठाण्यानेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने 'धर्मवीरांचा जय महाराष्ट्र' प्रेमानं स्वीकारला आहे.
हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर' ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
तीन दिवसांत केली होती 9.59 कोटींची कमाई
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा 13 मे ला शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती. आता तीन दिवसांत या सिनेमाने 9.59 कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहत आहेत.
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या