(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'TDM'ला थिएटर स्क्रीन मिळत नसल्यानं अजित पवार यांनी केलं ट्वीट; म्हणाले, 'अत्यंत दुर्दैवी...'
अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच 'टीडीएम' चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले आहे.
Bhaurao Karhade TDM Marathi Movie : भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांना 'ख्वाडा'आणि 'बबन' या चित्रपटांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली. आता त्यांचा 'टीडीएम' (TDM) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला थिएटलमध्ये स्क्रीन मिळत नसल्यानं या चित्रपटाच्या टीमला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर टीडीएम या चित्रपटाच्या टीमचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटातील कलाकार भावूक झाले आहेत. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच 'टीडीएम' चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अजित पवार यांचे ट्वीट
अजित पवार यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.'
भाऊराव कऱ्हाडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत,"टीडीएम' हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही"
राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 2, 2023
मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये स्क्रीन मिळत नाही, त्यामुळे हे चित्रपट चांगली कमाई करु शकत नाही, असं अनेकांचे मत आहे. आजवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी स्क्रीन मिळण्यासाठी आवाज उठवला आहे. तसेच काही राजकीय पक्षांनी देखील मराठी चित्रपटांना शो मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. आता 'टीडीएम' (TDM) चित्रपटाला शो मिळतील का ? याकडे अनेकांचे लक्ष लागेल आहे. अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी यांनी टीडीएम या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :