Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी
Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे.
Ameesha Patel Surrender: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु, तिच्या अडचणीत सध्या वाढ झाली आहे. 5 वर्ष जुन्या चेक बाऊन्सच्या प्रकरणात शनिवारी (17 जून) रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. या दरम्यान, कोर्टाने अमिषा पटेलला 21 जून रोजी पुन्हा प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अमिषाच्या विरोधात रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं, त्यानंतर अमिषा पटेल शनिवारी (17 जून) कोर्टात हजर झाली. 2017 च्या चेक बाऊन्स फसवणूक प्रकरणात अमिषाने कोर्टात आत्मसमर्पण केलं आहे, कोर्टात हजर झाल्यानंतर तिला 21 जूनपर्यंत सशर्त जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे.
रांची दिवाणी न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायिक भागीदार क्रुणाल यांच्याविरुद्ध एप्रिल महिन्यात फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणात वॉरंट जारी केलं होतं. तक्रारदार अजय कुमार सिंग यांनी अमिषा पटेल आणि तिच्या साथीदाराविरुद्ध फसवणूक, धमकी देणं आणि चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला होता. कोर्टाच्या वॉरंटनंतर शनिवारी अमिषा पटेल दिवाणी न्यायालयात हजर झाली. न्यायालयाने अमिषा पटेलला 10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने तिला समन्स बजावून हजर राहण्यास सांगितलं होतं, मात्र तेव्हा अमिषा पटेल हजर राहिली नव्हती. त्यानंतर न्यायालयाने पुन्हा वॉरंट जारी केलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण 2017 सालचं आहे. अभिनेत्री अमिषा पटेलवर अडीच कोटींच्या फसवणुकीचा आरोप होता. अजय कुमार सिंह झारखंडचा निर्माता आहे. 'देसी मॅजिक' चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अमिषा पटेलने आपल्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा दावा अजय सिंहने केला होता. 2017 साली हरमू हाऊसिंग कॉलनीत एका कार्यक्रमादरम्यान झारखंड येथील चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह हे अमीषा पटेलला भेटले होते, त्यावेळी अजय कुमार सिंह यांना चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्याच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. अजय कुमार यांनी सांगितल्यानुसार त्यांनी देसी मॅजिक हा चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अमिषा पटेलच्या खात्यात अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. अजय कुमार सिंग हे लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंटचे मालक आहेत. ठरवलेला चित्रपट न बनवल्याने आणि पैसे परत न मिळाल्याने अजय कुमार सिंह यांनी कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. अमिषा पटेल हिने आपली फसवणूक केल्याचे अजय कुमार यांनी तक्रारीत म्हटले होते. चित्रपट बनला नाही म्हणून अजय कुमार सिंह यांनी अमिषाला पैसे परत मागितले. त्यानंतर अमिषाने अजय कुमार सिंह यांना चेक दिला होता, मात्र तो बाऊन्स झाला.
अजय कुमार यांनी लावलेल्या आरोपांनुसार, अमिषा पटेल आणि तिच्या व्यावसायिक भागीदाराने चित्रपट पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांनी पैसे परत केले नाही. देसी मॅजिकचे शूटिंग 2013 मध्ये सुरू झाले होते. मात्र, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. चित्रपट निर्मात्याने अमिषा पटेलकडे पैसे मागितले तेव्हा तिने त्याला पैसे परत केले नाही. बऱ्याच कालावधीनंतर अमिषाने ऑक्टोबर 2018 मध्ये अजय कुमार यांना 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले, जे बाऊन्स झाले. या प्रकरणी अजय कुमार सिंह यांनी कोर्टात धाव घेतली.
हेही वाचा:
Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या वादावर अरुण गोविल यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...