Bigg Boss Jay Dudhane : बिग बॉस फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
Bigg Boss Jay Dudhane : जय दुधाणे याचे वडील अनिल दुधाणे (Anil Dudhane) यांचे निधन झाले आहे. जय दुधाणे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे.
Bigg Boss Jay Dudhane : 'बिग बॉस फेम' अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) आणि त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जय दुधाणे याचे वडील अनिल दुधाणे (Anil Dudhane) यांचे निधन झाले आहे. जय दुधाणे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. मी माझा सुपरहिरो गमावला असल्याची भावूक प्रतिक्रिया जयने व्यक्त केली आहे.
जय दुधाणे याचे वडील अनिल दुधाणे यांच्या पार्थिवावर बुधवारी, 26 जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जय दुधाणेने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. 24 जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते. ते नेहमी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि आश्वासक वृत्तीसाठी ओळखले गेले. सामाजिक कार्य ही त्यांची आवड होती. त्यांनी कधीही पैशांचा मोह केला नाही. नेहमी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कायमच त्यांनी केला असल्याचे जयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
View this post on Instagram
24 जून 2024 हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असेल कारण मी फक्त वडीलच गमावले नाहीत तर एक सच्चा मित्र, खरा पालक, खरा माणूस गमावला असल्याची भावूक प्रतिक्रिया जय दुधाणेने व्यक्त केली. त्यांना ओळखणाऱ्या सर्व लोकांसाठी ते एक चांगल्या व्यक्तीचे उदाहरण होते असेही जय दुधाणेने म्हटले. जयने पुढे म्हटले की, तुम्ही कायमच माझ्या हृदयात राहाल. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे देवाचे आशिर्वाद तुम्हाला लाभो असेही जयने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले.
जय दुधाणे हा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याची ग्रे शेडची भूमिका असून प्रेक्षकांना त्याची भूमिका आवडत आहे. बिग बॉस मराठीमध्ये जय दुधाणे याने आपल्या परफॉर्मन्सने छाप सोडली होती.