(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UP MLC Election: विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापले असतानाचं उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी होणार निवडणूक
उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे विधानसभेच्या निवडणुका लागल्या असतानाच आता विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी देखील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील 35 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होत आहे.
UP MLC Election: सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे विधानसभेच्या निवडणुका लागल्या असतानाच आता विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी देखील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील 35 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी 3 आणि 7 मार्चला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मथुरा-एटा-मैनपुरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दोन जागा आहेत. या मतदारसंघात स्वतंत्र निवडणुका घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 29 जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात सहा जागांसाठी मतदान होणार आहे. 3 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना 4 फेब्रुवारीला, तर दुसऱ्या टप्प्यातील 7 मार्च रोजी होणाऱ्या मतदानाची अधिसूचना 10 फेब्रुवारीला जारी केली जाणार आहे. 12 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
पुढच्या काही दिवसात पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशसह, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 10 मार्चला या सर्व पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषदेच्या जागांसाठी देखील निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांवर मतदान होत आहे. सी वोटरच्या सर्वेनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. तर समाजवादी पार्टीला 145 ते 157 जागा, बीएसपी ला 8 ते 16 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर इंडिया टीव्हीच्या सर्वेनुसार भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 230 ते 235, समाजवादी पार्टीला 160 ते 165, बीएसपी ला 2 से 5 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळतील असा अंदाज सांगण्यात आला आहे. या निवडणुकांच्या निमित्तीने समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: