UP Election 2022: स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह धर्म सिंह सैनी यांचा समाजवादी पार्टीत प्रवेश
योगी मंत्रीमंडळातील राजीनामा दिलेले मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी अखेर समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत मौर्य यांनी प्रवेश केला.

Assembly Election Live Update : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये चांगल्याच राजकीय हालचाली घडत आहेत. निवडणुकांपुर्वीच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जोरदार धक्के बसले आहेत. योगी मंत्रीमंडळातील राजीनामा दिलेले मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी अखेर समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत मौर्य यांनी प्रवेश केला. त्यानंतर अखिलेश यादव यांच्या हस्ते त्यांना पक्षाचे सदस्यत्व देखील देण्यात आले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले धर्म सिंह सैनी यांनीदेखील समाजवादी पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे. यांच्याबरोबरच बृजेश प्रजापती, भगवती प्रसाद सागर, मुकेश वर्मा, रोशन लाल वर्मा, विनय शाक्य, अपना दल चे चौधरी अमर सिंह, युसुफ अली, नीरज मौर्य, हरपाल सैनी शामिल यांनी आज समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले दारा सिंह चौहान यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. दारा सिंह चौहान हे 16 जानेवारीला आपल्या समर्थकांसह समाजवादी पार्टीत प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेश झाल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी पगडी घालून अखिलेश यादव यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना धर्म सिंह सैनी म्हणाले की जर कोरोनाचे संकट नसते तर 10 लाखांपेक्षा जास्त लोक याठिकाणी अखिलेश यांचे स्वागत करण्यासाठी आले असते. अखिलेश यादव यांना 2022 ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तर 2024 ला ते देशाचे पंतप्रधान करणार असल्याचे यावेळी धर्म सिंह म्हणाले.
यावेळी बोलताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी देखील भाजपवर जोरदार निशाणा लगावला. आजचा दिवस भारतीय जनता पक्षाच्या अंताचा इतिहास लिहिणार आहे. कुंभकर्णासारख्या झोपणाऱ्या भाजपच्या नेत्यांना, आमदार, खासदार यांच्याशी बोलायला वेळ नव्हता. आज त्यांची झोप उडणार असल्याचे यावेळी मौर्य म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
