कामासाठी तिळगुळाची वाट न पाहता, कामं केली तर, नक्कीच लोकं गोड बोलतील, गोड वागतील : मुख्यमंत्री
CM Uddhav Thackeray : कामासाठी तिळगुळाची वाट न पाहता कामं केली तर नक्कीच लोकं आपल्याशी गोड बोलतील, गोड वागतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांचे कान टोचले.
CM Uddhav Thackeray : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'व्हॉट्सअप चॅट बॉट' सुविधेचं आज लोकार्पण होत आहे. या सुविधेद्वारे 80 सेवा सुविधांची माहिती नागरिकांना व्हॉट्सअॅपवरून मिळणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सुविधेचं लोकार्पण होत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, 8999-22-8999 या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. या सुविधेचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना संबोधित केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, "सरकारी कामाबाबत अशी कायम चर्चा असते की, तिळगुळ द्यावा लागतो. परंतु या कामाबाबत तसं काही झालेलं नाही. आता यानिमित्ताने छोटी छोटी कामे पूर्ण होणार आहेत. आजचा कार्यक्रम हा क्रांतिकारक कार्यक्रम आहे. देशातील एकमेव महापालिका आहे, जिने अशाप्रकारे उपक्रम सुरू केला आहे.
"व्हॉट्स अॅपचा उपयोग आणि दूरपयोग यातील फरक जाणून घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारा आहे. अनेकजण असे आहेत की, कामं करतात परंतु दाखवत नाहीत. मग प्रश्न निर्माण होतो 'जंगल में मोर नाचा किसने देखा' कौतुक करावं किंवा ते किती होईल म्हणून आपण काम करत नाही. चांगल्या कामांची दखल घेतली जात नाही. परंतु थोडी चूक झाली की, महापालिकेला टार्गेट केलं जातं. परंतु आता महापालिका नेमकं काय काम करते? हे आता सर्वांना कळणार आहे.", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ : आपलं कौतुक घरच्यांनी नव्हे तर कोर्टाने केलं : मुख्यमंत्री
लोकप्रिय मुख्यमंत्री ही केवळ मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता असत नाही, तर ते पूर्ण टीमचं काम असतं. सर्वांनी मला साथ दिली नसती, तर महापालिकेचं जगात कौतुक झालं नसतं. पालिकेला जिथं जिथं गरज लागेल तिथं सरकार आपल्या पाठीशी उभे असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कामासाठी तिळगुळाची वाट न पाहता कामं केली तर नक्कीच लोकं आपल्याशी गोड बोलतील, गोड वागतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांचे कानही टोचले आहेत.
दरम्यान, आज शुक्रवार, दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी माननीय वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित होते.