एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीत मोदींसाठी बंगल्याची शोधाशोध, गृहप्रवेश होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांची प्रार्थना
अर्थातच ही शोधाशोध म्हणजे मोदी पुन्हा येणार नाहीत याचे संकेत अजिबात नाहीत. केवळ आणि केवळ औपचारिकता म्हणूनच हे काम सुरु आहे. ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी म्हणून ही खबरदारी घ्यावी लागते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदींसाठी एक बंगला शोधण्याचं काम सुरु आहे, पण या बंगल्यात जायची मोदींना बिलकुलही इच्छा नसेल. कारण हे आहे पंतप्रधानांचं निवृत्तीनंतरचं घर..मोदी आणि निवृत्ती? असं म्हणून लगेच घाबरु नका..ही आहे सरकारी औपचारिकता. भलेही भाजप, मोदी दावा करत असतील की पुढची टर्मही आम्हीच जिंकणार, पण सरकारी कामं अशा शक्यतांवर विसंबून चालत नाही. त्यामुळे मोदींऐवजी दुसरं कुणी पंतप्रधान झाल्यास, मोदींच्या राहण्याची व्यवस्था आधीच तयार असावी म्हणून नगरविकास मंत्रालयाने हा शोध सुरु केला आहे.
माजी पंतप्रधानांसाठी टाईप 8 चे बंगले राखीव ठेवले जातात. सध्या नगरविकास मंत्रालयाकडे तीन पर्याय आहेत. त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे 6 ए कृष्णमेनन मार्ग असा पत्ता असलेला हा बंगला. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर याच बंगल्यात राहत होते. त्यांच्या निधनानंतर हा बंगला आता रिकामा करण्यात आला आहे.
दुसरा पर्याय आहे 9 जनपथ क्रमांकाच्या बंगल्याचा. गेली दहा वर्षे हा बंगला रिकामाच आहे. विशेष म्हणजे या बंगल्या शेजारीच 10 जनपथ हे सोनियांचं निवासस्थान आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आजवर हा बंगला कुणाला देण्यात आला नव्हता. तुघलक मार्गावरचा शरद यादव यांचाही बंगला नगरविकास मंत्रालयाच्या लिस्टमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शरद यादव इथे राहत आहेत, पण सध्या ते कुठल्याच सभागृहात खासदार नाहीत.
अर्थातच ही शोधाशोध म्हणजे मोदी पुन्हा येणार नाहीत याचे संकेत अजिबात नाहीत. केवळ आणि केवळ औपचारिकता म्हणूनच हे काम सुरु आहे. ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी म्हणून ही खबरदारी घ्यावी लागते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
अशी आधीच खबरदारी न घेतल्याने नव्या पंतप्रधानांना फटका बसल्याचं उदाहरण इतिहासात आहे. 2004 मध्ये भाजपचं सरकार पुन्हा केंद्रात येणार, वाजपेयीच पंतप्रधान बनणार हे जणू सगळ्यांनी गृहीतच धरलं होतं. पण झालं उलटच, पंतप्रधान बनले मनमोहन सिंह..तोपर्यंत वाजपेयींसाठी नवं निवासस्थान तयार नसल्याने पहिला महिनाभर मनमोहन सिंह हे 7 रेसकोर्सवर राहायला जाऊच शकले नव्हते. त्यावेळी राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना जो 19 सफदरजंग रोड बंगला मिळाला होता. तिथूनच ते पंतप्रधान कार्यालयात पोहोचत होते.
खासदारांप्रमाणे पंतप्रधानांनाही मुदत संपल्यानंतर एक महिन्याची नोटीस देऊन त्या निवासस्थानी राहता येतं. पण पंतप्रधानांच्या बाबतीत अडचण ही होते, की 7 लोककल्याण मार्ग (पूर्वीचे 7, रेसकोर्स रोड) या बंगल्यातच पंतप्रधानांचं एक कार्यालयही बनवण्यात आलं आहे. त्यामुळे हा बदल सुलभ पद्धतीने झालेला प्रशासनासाठी फायदेशीर ठरतं. पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्यानंतरही त्यांना एसपीजी सुरक्षा असते. ल्युटियन्स झोनमधला सर्वोत्तम सुविधा असलेला टाईप-8चा बंगला त्यांना दिला जातो. मोदींसाठीही हीच शक्यता गृहीत धरुन शोध सुरु आहे, अर्थातच भाजपचे कोट्यवधी कार्यकर्ते हीच प्रार्थना करतील की या बंगल्यात जाण्याची वेळ त्यांच्यावर किमान इतक्यात तरी येऊ नये.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement