BMC : निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज! 85 लाख मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण; उर्वरित 15 लाख चिठ्ठ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध
BMC Election : निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील 10,231 मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मुंबईतील सुमारे 85 लाख मतदारांपर्यंत मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण (Voter Information Slip) पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित 15 लाख मतदार माहिती चिठ्ठ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाची महत्त्वाची भूमिका
मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक अशी आवश्यक माहिती असलेली मतदार माहिती चिठ्ठी (Voter Information Slip) प्रत्येक पात्र मतदारापर्यंत वेळेत आणि अचूकपणे पोहोचवण्याची जबाबदारी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. संबंधित प्रशासकीय वॉर्डमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी ही चिठ्ठी वितरित करण्यात आली.
मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर मुंबईकर मतदारांनी 15 जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रासंबंधीची माहिती सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या 6,701 कर्मचाऱ्यांची तैनाती
पालिकेचे उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, मतदारांना मतदान प्रक्रिया सोपी व सुलभ व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने मतदानापूर्वी काही दिवस आधी मतदार माहिती चिठ्ठ्या वितरित करण्यात आल्या. या कामासाठी एकूण 6,701 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये 5,138 कर्मचारी, 945 स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, 100 आशा कार्यकर्त्या आणि 518 बूथ स्तर अधिकारी (BLO) यांचा समावेश होता.
स्वच्छतेसाठी विशेष मोहीम
निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील 10,231 मतदान केंद्रांवर निवडणुकीपूर्वी आणि मतदानाच्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मतदार आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी चार हजारांहून अधिक शौचालये, त्यामध्ये पोर्टेबल व मोबाइल युनिट्सचा समावेश असून, उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच 14 व 15 जानेवारी 2026 रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून, सर्व मतदान केंद्रांवर अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असेही दिघावकर यांनी सांगितले.
ही बातमी वाचा:




















