भाजपच्या भाऊसाहेब वाकचौरेंची बंडखोरी, शिर्डीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
भाऊसाहेब वाकचौरे हे माजी खासदार असून सध्या ते भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्त पदही ते भूषवत आहेत. शिवसेनेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा भाऊसाहेब वाकचौरे यांना होती.
शिर्डी : लोकसभा निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे आणि शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर होताच सध्या भाजपात असलेले व सेनेकडून इच्छुक असणारे भाऊसाहेब कांबळे यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याचा पवित्रा घेतल्यानं शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीतील चुरस वाढणार आहे.
भाजपमधून बंडखोरी करत भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी सांगितलं. शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची असलेली नाराजी या कारणामुळे मला ही निवडणूक लढवायची आहे, अशी भूमिका वाकचौरे यांनी बोलून दाखवली.
भाऊसाहेब वाकचौरे हे माजी खासदार असून सध्या ते भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्त पदही ते भूषवत आहेत. शिवसेनेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा भाऊसाहेब वाकचौरे यांना होती. परंतु शिवसेनेनं तिकीट नाकारल्याने वाकचौरे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. वाकचौरे यांच्या बंडखोरीमुळे शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान 2009 मध्ये रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदार संघात पराभव करीत भाऊसाहेब वाकचौरे प्रसिद्धी झोतात आले होते. मात्र मागील निवडणुकीत वाकचौरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसकडून उमेदवारी घेतली आणि त्यात त्यांचा पराभव झाला.
मागील लोकसभा निवडणुकीत पराभव होताच वाकचौरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढविली त्यात ही त्यांचा पराभव झाला. यानंतर भाजपने त्यांना शिर्डी संस्थानचं विश्वस्तपदाची जबाबदारी दिली.