मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अकोट नगरपालिकेतील भाजप-एमआयएमची युती तुटली, युतीसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर कारवाई होणार
अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने एमआयएमशी हातमिळवणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अकोट नगरपालिकेतील युती तुटली आहे.
Akola News : अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने एमआयएमशी तर ठाण्यातील अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्तेसाठी भाजपने कट्टर विरोधकांसोबत आघाडी केल्याने विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे. दुसरीकडे या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अखेर अकोटमधील भाजप-एमआयएमची युती तुटली आहे.
अकोटमधील भाजपच्या नेत्यांवर कारवाई होणार
एमआयएम'सोबत युती करण्यास पुढाकार घेणाऱ्यांवर भाजप कारवाई करणार आहे. सर्वात आधी 'एबीपी माझा'ने ही बातमी दाखवली होती. या बातमीनंतर मोठी खळबळ उडाली होती. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 'एमआयएम'सोबत युतीचा निर्णय घेणारे भाजपचे नेते, अकोटमधील पक्षाचे पदाधिकारी, गटनेते यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या अंतस्थ सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. सर्वात आधी युती करण्याच्या निर्णयात दोषी असलेल्या सर्वांना पक्ष कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, भाजपचे शहराध्यक्ष, निवडणूक प्रभारी, गटनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार आहे. अकोटमधील या प्रकारामुळं पक्ष नेतृत्व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि पदाधिकाऱ्यांवर नाराज आहे. एमआयएणचे पाचही नगरसेवक समर्थनाचे पत्र मागे घेण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळं एमआयएम अकोट नगरपालिकेत विरोधात बसणार आहे.
भाजपने अकोट नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या
भाजपच्या नेतृत्वात अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला होता. भाजपने अकोट नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. मात्र, 35 जागा असलेल्या नगरपंचायतीमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली नाही. त्यामुळे विरोधी पक्षात सर्वाधिक पाच जागा जिंकलेल्या एमआयएमला अकोट विकास मंचात घेत सत्तेवर दावा सांगितला होता. विशेष म्हणजे या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंच्या प्रहारचा देखील समावेश होता. या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
Akot Election : अकोट नगरपालिकेतील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 35
निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार)
पक्षीय बलाबल :
भाजप : 11
काँग्रेस : 06
शिंदेसेना : 01
उबाठा : 02
वंचित : 02
अजित पवार राष्ट्रवादी : 02
शरद पवार राष्ट्रवादी : 01
प्रहार : 03
एमआयएम : 05
शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिला आहे. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. काँग्रेसमुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने केली आहे. मात्र या नव्या राजकीय समीकरणाने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भाजपा पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमतात येणार असल्याच्या दावा केला जात आहे. मात्र ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.





















