दहावी, बारावीच्या गुणपत्रिकांसाठी Digilocker App डाऊनलोड करा; CBSE चा विद्यार्थ्यांना एसएमएस
सीबीएसई बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवला असून त्यांना निकाल पाहण्यासाठी डिजिलॉकर (Digilocker) हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीख जवळ आली आहे. 15 जुलै रोजी निकाल जाहीर होतील, असं म्हटलं जात आहेत. यासाठी बोर्डाची तयारी सुरु आहे. सोबतच बोर्डाकडून विद्यार्थ्यांना एक विशेष एसएमएस पाठवला जात असून त्यांना निकाल पाहण्यासाठी डिजिलॉकर (Digilocker) हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं आहे. विद्यार्थी याच अॅपवर आपली गुणपत्रिका पाहू शकतात.
डिजिलॉकर अॅपमध्ये गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मिळणार कोरोना विषाणूमुळे आलेल्या महामारीमुळे सीबीएसई बोर्डाची परीक्षा स्थगित करण्यात आळी. त्यानंतर जूनअखेरीस बोर्डाने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. जेवढ्या विषयांची परीक्षा झाली, त्याच्या आधारावर गुण देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
आता बोर्डाने सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठवून गुणपत्रिका पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी डिजिलॉकर अॅप मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करण्याचं आवाहन केलं आहे. डिजिलॉकर हे केंद्र सरकारचं अॅप आहे, ज्यात भारतीय नागरिक आपले सर्व महत्त्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरुपात सुरक्षित ठेवू शकतात आणि गरज असेल तेव्हा कोणत्याही ऑनलाईन अर्जासाठी त्याचा सहजरित्या वापर करु शकतात.
सीबीएसईने आपल्या मेसेजमध्ये सांगितलं आहे की गुणपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अॅप डाऊनलोड करावं लागेलं. यामध्ये लॉग इन करण्यासाठी सीबीएसईकडे नोंद असलेला मोबाईल क्रमांक टाईप करावा लागेल, त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल.
यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा नंबरचे अखेरचे सह अंक टाईप करावे लागतील, जो त्यांचा सिक्युरिटी पिन असेल. मग डॅशबोर्ड सुरु होईल आणि तिथून विद्यार्थी आपली गुणपत्रिका डाऊनलोड करु शकतात.
विशेष बाब म्हणजे दहावीसाठी यंदा बोर्डाची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र याचा एकच दस्तऐवज असेल. मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीप्रमाणे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र वेगवेगळे मिळतील आणि ते अशाच प्रकारे डाऊनलोड करता येऊ शकतात.
अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य नाही टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, बोर्डाने मेसेज पाठवला असला तरी हे अॅप डाऊनलोड करणं विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नाही. ज्या विद्यार्थ्यांना अॅप डाऊनलोड करायचं नसेल ते digilocker.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करुनही आपली गुणपत्रिका डाऊनलोड करु शकतात.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI