CBSE Board Exam 2022 : 'सीबीएसई' दहावी, बारावीची परीक्षा दोन सत्रांत; केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय
‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीची पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये होईल, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार आहे.
CBSE Board Exam 2022 : सीबीएसईने सोमवारी 2021-22 सत्रासाठी दहावी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षांसाठी विशेष मूल्यांकन योजना जाहीर केली. करोना विषाणूसाथीमुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा विचार करत येणाऱ्या बोर्डासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी ही नवीन योजना प्रसिद्ध केली गेली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) या नव्या योजनेनुसार शैक्षणिक वर्ष दोन सत्रांत विभागले असून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचीही एक वार्षिक परीक्षा घेण्याऐवजी दोन परीक्षा घेण्यात येणार आहेत. बोर्डाने या संबंधिचा अभ्यासक्रम या महिन्याच्या अखेरीपर्यंत जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शैक्षणिक वर्ष दोन सत्रांत विभागलं
सीबीएसईचे संचालक जोसेफ इमॅन्युएल यांच्या अधिकृत आदेशानुसार, “केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शैक्षणिक वर्ष 2021-2022 च्या विशेष मूल्यांकन योजनेंतर्गत अभ्यासक्रम दोन भागात विभागला जाईल. त्यासाठी त्या विषयांच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. 50-50 टक्के अभ्यासक्रमानुसार पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येईल“.
ते म्हणाले की, “अभ्यासक्रमाच्या विभाजनाच्या आधारे, बोर्ड प्रत्येक सत्राच्या शेवटी परीक्षा घेईल. शैक्षणिक सत्राच्या शेवटी मंडळाची दहावी आणि बारावी परीक्षा घेण्याची शक्यता वाढविण्याच्या उद्देशाने हे केले गेले आहे”. याबरोबरच अंतर्गत मूल्यांकन आणि प्रोजेक्टचं मूल्यमापन अधिक काटेकोर आणि विश्वासार्ह व्हावे यासाठी आता शैक्षणिक वर्ष दोन सत्रांत विभागण्यात आले आहे.
पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर
पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात येणार आहे. त्यात मल्टीपल चॉईस प्रश्न (MCQ) असतील ज्यात रेशनलिझिंग अभ्यासक्रमातील पहिल्या भागाचा समावेश असेल. या परीक्षांचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. या प्रश्नपत्रिका बोर्डाकडून शाळांमध्ये पाठवल्या जातील. त्यानंतर बाह्य परीक्षक आणि पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली परीक्षा घेण्यात येईल आणि त्यासंबंधीत निकाल बोर्डाकडे पाठवले जातील.
दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिल
दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येतील. या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल. ज्यामध्ये विविध स्वरुपाचे प्रश्न असतील. परंतू "जर सर्वसाधारण परिस्थिती डिस्क्रिप्टिव परीक्षा घेण्यास अनुकूल नसेल, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा देखील 90 मिनिटांच्या मल्टीपल चॉईस प्रश्न (MCQ) स्वरूपात घेतली जाईल. दोन्ही सत्रांच्या परीक्षांचा निकालांचे एकत्रिक करुन अंतिम परीक्षेत गुण दिले जाणार आहेत. तसेच बोर्डानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार पर्यायांची एक यादी तयार केली आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत यंदा पेच निर्माण झाला. गेल्यावर्षी काही विषयांची परीक्षा रद्द करावी लागली तरी यंदा सर्वच परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. सलग दोन शैक्षणिक वर्षे निर्माण झालेल्या या परिस्थितीपासून धडा घेऊन चालू शैक्षणिक वर्षांचे (2021-22) नियोजन मंडळाने केले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI