Barshi Scam: फटेचा 'विशाल' गेम; दिखावा करुन दिग्गजांना भुलवलं! ब्लॅक मनीवाल्यांची चुप्पी! कॅमेरासमोर न आलेल्या गोष्टी
Solapur Barshi Froud Case : बार्शीतल्या प्रत्येक चौकात, चहाच्या टपऱ्यांवर, दुकांनामध्ये केवळ एकच विषय सुरु आहे कोणाचे किती बुडाले. मात्र काही जणांना अजूनही आपले पैसे परत मिळतील याची आशा आहे.
Solapur Barshi Froud Case : बार्शीच्या स्कॅम प्रकरणात सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. बार्शीतल्या प्रत्येक चौकात, चहाच्या टपऱ्यांवर, दुकांनामध्ये केवळ एकच विषय सुरु आहे कोणाचे किती बुडाले. यामध्ये प्रामुख्याने राजकारणी, डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक यांची नावे घेतली जात आहेत. अर्थात यापैकी अद्याप एक ही व्यक्ती तक्रार द्यायला आतापर्यंत तरी पुढे आलेली नाहीये. मात्र त्यांच्या नावाच्या चर्चा बार्शीत रंगतायात. आरोपी विशाल फटे हा गुंतवणुकदारांनी कोणत्याही मार्गाने पैसे दिले तरी स्विकारायचा. त्यामुळे ज्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी काळे धन जमा केले आहे. ते दुप्पट करण्याच्या आमिषाने विशालकडे दिले होते. हा आकडा शेकडो कोटींचा असल्याची चर्चा सध्या बार्शीत सुरु आहे.
आरोपी विशाल फटे याने बार्शीत बरेच मित्र जमवले होते. अगदी सख्या भावाप्रमाणे विशालचे मित्र त्याला वागणूक देत होते. विशालने याच विश्वासाचा फायदा घेत अनेक मित्रांचे अकाऊंट वापरले. गुंतवणुकदारांना मित्राच्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगायचे. मित्रांकडून चेक घेऊन ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग तो करत होता. फरार होण्याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने एका मित्राच्या अकाऊंटवर जवळपास 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. नंतर चेकद्वारे त्याने ते काढून देखील घेतले. अशी माहिती या प्रकरणातील फिर्य़ादी दीपक आंबरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
कॅमेरासमोर न आलेल्या गोष्टी....!
बार्शीतील अनेक जण अद्याप देखील कॅमेरासमोर बोलायला तयार नाहीयेत. यातील काही जणांना भिती आहे. तर काही जणांना अजूनही आपले पैसे परत मिळतील याची आशा आहे. ज्या लोकांनी बेहिशेबी किंवा कर चुकवलेली मोठी रक्कम विशालकडे दिली होती. त्यांना तक्रार दिली तर उलट आपणच फसू, पैसे ही गेले आणि वरुन गुन्हा देखील नोंद होईल अशी भिती आहे. तर दुसरीकडे विशाल काही दिवसांनी परतेल. तेव्हा तो आपले पैसे परत करेल अशी आशा आहे. त्यामुळे अनेक जण कॅमरे समोर बोलायला देखील तयार नाहीयेत. मात्र कॅमेरामागे बोलताना अनेकांना भावना अनावर झाल्या.
विशाल गुंतवणुकदारांना स्वत: तयार केलेल्या एका वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला सांगायचा. जेव्हा लोक त्याला डिमॅट अकाऊंटबद्दल विचारायचे तेव्हा तुम्ही त्याची चिंता करु नका आम्ही ते लिंक करुन घेऊ असे तो सांगायचा. गुंतवणुकदारांकडून पैसे घेतल्यानंतर दर महिन्याला त्यांना कितीचा फायदा झालाय हे तो मेसेज करुन सागांयचा मात्र वास्तव्यात अकाऊंटमध्ये कोणतेही पैसे नसायचे. जेव्हा कोणी पैसे काढण्यासाठी सांगायचे तेव्हा तो त्यांना आणखी आमिष दाखवयाचा. पुढच्या महिन्यात आपीओ आहेत. पैसे काढल्यास नुकसान होईल अशी भिती दाखवयाचा. त्यामुळे लोक पैसे काढण्याऐवजी आणखी गुंतवतच राहिले.
वेगवेगळी स्किम सांगून प्रलोभन
दरवेळी गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून तो प्रलोभन देत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. 'एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली ६ हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील' अशी ऑफर दिल्यानंतर अनेक जणांना धक्काच बसला.
बड्या लोकांना हुसकावून लावायचा
विशालचे मित्र सांगतात की अनेक जण पैसे घेऊन ऑफिसच्या चकरा मारत होते. ऑफिसमध्ये लोकांची गर्दीच गर्दी होती. या गर्दीत अनेक मोठे लोक देखील येत होते. मात्र तुम्हाला पैशाची काय कमी आहे. ही ऑफर सामान्यांसाठी आहे असे म्हणून तो त्यांना परत पाठवायचा. यामुळे लोकांना विशाल जणू देव आहे असेच वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या अंधविश्वास ठेवत अनेक जणांनी 10 लाख रुपयांप्रमााणे कोट्यावधी रुपये विशालकडे जमा केले. पैसे जमा करुन अवघे काही दिवस झाले असतील तोच विशाल पसार झाल्याच्या बातम्या आल्याने अनेकांना धक्का बसलाय. बार्शीत काही जण असे आहेत त्यांनी आपल्या जमीनी विकल्या, फ्लॅटवर लोन काढले. कित्येकांनी सोने गहाण ठेवले. तर काही जणांनी तर खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन गुंतवणूक केली आहे. विशाल पसार झाल्यापासून हे कर्ज फेडायचे कसे अशा प्रश्न आता या लोकांसमोर उभा राहिला आहे.
काही वर्ष शिक्षणासाठी पुण्यात
विशालच्या कुटुंबियांनी जवळच्या लोकांकडे सांगितल्याप्रमाणे तो काही वर्ष शिक्षणासाठी पुण्यात होता. तिथून तो बार्शीत परतला. त्याच्याकडे कोणती डिग्री होती की नाही याची कोणाला माहिती नाही. मात्र तो उत्तम इंग्रजी बोलत होता. अनेकांना केवळ आपल्या बोलण्याने त्याने भुरळ घातली होती. उच्च पदस्थ अधिकारी, राजकारण्यांसोबतचे फोटो तो लोकांना दाखवयाचा. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एका वाहिनीने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिलेला पुरस्कार. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाल्याचे लोकांना सांगताच अनेकांचा विश्वास वाढला. सत्कारासाठी ऑफिसमध्ये रांगा, सोशल मीडियावर फोटो फिरु लागले होते. यामुळे केवळ बार्शीच नाही तर महाराष्ट्रातील अन्य भागांमधून देखील लोकांनी पैसे विशालकडे गुंतवले.
स्कॅममध्ये सावज ठरलेले अनेक गुतंवणूकदार तरुण
बार्शीतल्या या स्कॅममध्ये सावज ठरलेले अनेक गुतंवणूकदार हे तरुण आहे. 25 ते 35 वर्षातील तरुणांचा आकडा हा मोठा आहे. तर ज्यांचा वापर विशालने केला त्या मित्रांची वयं देखील साधरण हीच आहेत. या तरुणांचा केवळ आर्थिक नाही तर मानसिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. आपला मित्र असा वागू शकतो यावर त्यांचा अद्याप ही विश्वास बसत नाहीये. विशालने केलेल्या या कोट्यवधींच्या फसवणुकीमुळे बार्शी काही वर्षे मागे गेली असे मत व्यक्त करत आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पैशाच्या आमिषामुळे किती मोठे नुकसान होऊ शकते याची प्रकर्षाने जाणीव होते. त्यामुळे गुंतवणूक करताना अत्यंत सावध राहून जागरुकतेने विचार करणे गरजेचे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Solapur, Barshi : सोलापूरच्या बार्शीत शेकडो कोटींच्या 'स्कॅम'मुळं खळबळ , मुख्य आरोपी विशाल फटे फरार