Pornography Case : मला मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पॉर्न प्रकरणात गोवलं; राज कुंद्राची सीबीआयकडे तक्रार
Raj Kundra Pornography Case : "मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात गोवलं होतं," असा दावा उद्योजक राज कुंद्राने सीबीआयला केलेल्या तक्रारीत केला आहे.
Raj Kundra Pornography Case : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने (Raj Kundra) केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे (CBI) तक्रार केली आहे. "मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात गोवलं होतं," असा दावा राज कुंद्राने आपल्या तक्रारीत केला आहे. "आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला हा एका प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने तयार केला होता. यासाठी त्याने मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या खोट्या प्रकरणात अडकवलं आणि अटक केली," असंही कुंद्राने तक्रारीत म्हटलं आहे. "माझ्याविरुद्ध दाखल याच प्रकरणाचा सीबीआयने पुन्हा तपास करावा, जेणेकरुन मला न्याय मिळेल," अशी मागणी आता राज कुंद्राने केली आहे. कुंद्राने आपल्या तक्रारीत काही अधिकाऱ्यांची नावंही लिहिली असून ते पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज कुंद्राकडून सातत्याने आरोपांचा इन्कार
"आपला पॉर्नोग्राफीच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही किंवा त्यांनी त्यातून कोणतेही पैसे कमावले नाहीत. हॉटशॉट अॅप माझ्या मेहुण्याचं होतं आणि ते अॅप अश्लील नव्हते, असं राज कुंद्राकडून सातत्याने सांगितलं जात होतं. तसंच ज्यावर ओटीटी अॅप चालू शकतात फक्त तेच सॉफ्टवेअर त्याच्या कंपनीने दिलं होतं. पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोणत्याही आरोपींशी आपला काहीही संबंध नाही. मुंबई पोलिसांनी 17 अॅप्सविरोधात एफआयआर दाखल केला होता, मात्र इतर कोणालाही हायलाईट करण्यात आलं नाही, केवळ यातून बदनामी केली गेली," असा दावाही कुंद्राने केला आहे.
क्राईम ब्रान्चमधील अधिकाऱ्यांवर राज कुंद्राचे गंभीर आरोप
राज कुंद्राने आपल्या तक्रारीत मुंबई क्राईम ब्रान्चमधील काही अधिकार्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात दाखल केलेल्या पहिल्या चार हजार पानांच्या आरोपपत्रात आपलं नाव नसतानाही, पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्व काही केलं. या खटल्यातील प्रत्येक साक्षीदारावर आपल्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा उल्लेख राज कुंद्राने तक्रारीत केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबत साक्ष देतील अशा अनेक साक्षीदारांचे तपशील आपण शेअर करु शकतो, असं राज कुंद्राने सीबीआयला सांगितलं.
'मीडिया ट्रायलमुळे 63 दिवस मी जेलमध्ये घालवले'
ज्या व्यावसायिकाच्या सांगण्यानुसार मला या प्रकरणात गोवण्यात आलं होतं त्याचे पोलिसांशी जवळचे संबंध होते. काही पोलिसांनी आपला काळा पैसा त्या व्यावसायिकाकडे गुंतवल्याचा आरोपही कुंद्राने तक्रारीत केला आहे. त्याने पुढे लिहिलं आहे की, "मी एक वर्ष गप्प बसलो आणि मीडिया ट्रायलमुळे मी 63 दिवस आर्थर रोड जेलमध्ये घालवले आहेत. मला न्यायालयाकडून न्याय हवा आहे, जो मला मिळेल, हे मला माहित आहे, या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी चौकशीची विनंती करतो."
पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याप्रकरणी राज कुंद्राला 19 जुलै रोजी त्याचा सहकारी रायन थॉर्पसह अटक करण्यात आली होती. अलीकडेच राज कुंद्राने पॉर्नोग्राफी प्रकरणी किला कोर्टात डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता, त्यावर उत्तर देताना गुन्हे शाखेने कुंद्राच्या अर्जाला विरोध करत त्याच्याविरुद्ध अनेक पुरावे असल्याचं सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने मुंबईच्या मालाडमधील मालवणी इथल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. या बंगल्यात अश्लील चित्रपट चित्रीत केले जात असून त्यासाठी मुलींवर दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्या बंगल्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा 3 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार थॉर्प यांना अटक केली. त्यानंतर पुरवणी आरोपपत्रात कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना वॉण्टेड जाहीर करण्यात आलं.