पंढरपुरात वाळू माफियांविरोधात प्रशासनाची धडक मोहिम, 17 होड्या कटरने नष्ट केल्या, एक ट्रॅक्टरही जप्त
Pandharpur Crime : पंढरपुरात वाळू माफियांच्या वाहतूक यंत्रणेवर प्रशासनाने मोठी कारवाई केलीये.
Pandharpur Crime : पोलीस आणि महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात अडकल्याने बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात निवडणूक संपताच पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. चंद्रभागेच्या पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर आज कारवाई करताना 17 होड्या कटरने तोडून टाकण्यात आल्या असून एक ट्रॅक्टर जप्त केला आहे.
वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या 17 लाकडी होड्या कटरच्या साह्याने नष्ट
अधिकची माहिती अशी की, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे तसेच पंढरपूर पोलीस यांनी संयुक्तपणे पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या 17 लाकडी होड्या कटरच्या साह्याने नष्ट केल्या. याशिवाय अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळू माफी यांचे कंबरडे मोडले
पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टरवर कारवाई केली असून, सदर ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला आहे. तसेच पंढरपूर, इसबावी, शिरढोण, चिंचोली भोसे दरम्यान असणाऱ्या भीमा नदी पात्रात वाळू चोरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण 12 लाकडी होड्या कटरच्या साह्याने कापून नादुरुस्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत, तसेच चळे येथे वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या 05 लाकडी होड्या जेसीबीच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळू माफी यांचे कंबरडे मोडले असून अशाच पद्धतीने ही कारवाई चालू राहील असे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या