शेअर मार्केटचा किंग! 1 लाख रुपयांचे दिले तब्बल 7.5 कोटी, टाटांच्या 'या' शेअरने अनेकांना केलं करोडपती
टाटा उद्योग समुहाच्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. भविष्यातही ही कंपनी चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जमोखमीचे निश्चितच असते. मात्र कंपन्यांचा, बाजाराच योग्य अभ्यास करून पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. चांगला परतावा देणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्या अशाच एका कंपनीचा समावेश आहे. रतन टाटा यांच्या या कंपनीने आल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत.
टाटा उद्योग समुहाच्या या कंपनीचे नाव ट्रेंट लिमिटेड (Trent Ltd) असे आहे. या शेअरने अनेक गुंतवणूकदारांना करोडपती केलं आहे. सध्या या शेअरचे मूल्य 7379 रुपये आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीचे उत्पन्न पाच पटींनी वाढले आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीने शेअर बाजारावर चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीने गुंतवणूदाराला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीत जवळपास 7.5 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
या वर्षी 146 टक्क्यांनी रिटर्न्स
टाटा उद्योग समुहाच्या या कंपनीने या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून साधारण 146 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. एक जानेवारी रोजी या शेअरचे मूल्य 3002 रुपये होते. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर हेच एक लाख रुपये 2.46 लाख रुपये झाले असते. म्हणजेच फक्त नऊ महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला असता
पाच वर्षांत पैशांचा पाऊस
या शेअरने गेल्या पाच वर्षांत गुतंवणूकदारांवर अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला आहे. पाच वर्षांपासून ट्रेंट लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल 1400 टक्क्यांनी परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी तुम्ही या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आज 15 लाख रुपये झाले असते. म्हणजेच पाच वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 पट परावा दिला आहे.
एका लाखाचे झाले 7.5 कोटी रुपये
टाटा उद्योग समुहाची ही कंपनी 1 जानेवारी 1999 रोजी सूचिबद्ध झाली होती. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली त्यावेळी तिच्या शेअरचे मूल्य 9.87 रुपये होते. साधारण 25 वर्षांनी हा शेअर आता 7379 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरने गेल्या 25 वर्षांत तब्बल 74662 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच 1999 साली एखाद्याने या कंपनीत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्या पैशांचे मूल्य आज 7.5 कोटी रुपये झाले असते. या कंपनीची सुरूवात 1998 साली झाली होती. हा एक फॅशन ब्रँड आहे. या कंपनीचे देशात 890 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
फक्त तीन दिवसांसाठी 'या' शेअरमध्ये पैसे टाका, मिळणार दमदार रिटर्न्स; जाणून घ्या टार्गेट काय असावे?
आरोग्य विम्याचा क्लेम कंपन्या का नाकारतात? 'ही' आहेत 6 प्रमुख कारणं?